महाराष्ट्र काँग्रेसची सूत्रं हाती घेतल्यानंतर नाना पटोले आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड करण्यात आली असून नुकतीच त्यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. या भेटीनंतर नाना पटोले यांनी राज्यात काँग्रेसला एक नंबरचा पक्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. २०२४ पर्यंत आपण हे लक्ष्य गाठणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दिल्लीत एएनआयशी बोलताना सांगितलं की, “महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचा अध्यक्ष झाल्यानंतर मी सोनियाजी आणि राहुलजी यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. महाराष्ट्रात पक्ष पहिल्या क्रमांकावर यावा यासाटी माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २०२४ पर्यंत हे लक्ष्य पूर्ण करु असा मला विश्वास आहे”.

२०१४ साली भंडारा-गोंदिया मतदारसंघातून नाना पटोले यांनी भाजपाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक जिंकली. पण पाच वर्षाच्या आतच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करत पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली होती. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढत त्यांनी विजय संपादित केला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आले. महाआघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

काँग्रेस राज्यातील नेतृत्व बदलणार असल्याची चर्चा होती. नव्या नेतृत्वाची चाचपणी करण्यासाठी दिल्लीतून काँग्रेसनं राज्यात प्रतिनिधीही पाठवले होते. यात अनेक नावं स्पर्धेत होती. काँग्रेसमध्ये अनेक वरिष्ठ नेते असल्यानं त्यांना सांभाळून घेणारं नेतृत्व निवडण्याचं आव्हान काँग्रेससमोर होतं. महत्त्वाचं म्हणजे एकेकाळी गढ असलेल्या विदर्भात काँग्रेस कुमकुवत झाली असून, पुन्हा पाय रोवण्यासाठी विदर्भाकडे प्रदेशाध्यक्षपद दिल्याचं बोललं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाना पटोले यांच्यासोबत सहा कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहमद आरिफ नासीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर प्रदेश उपाध्यक्षपदी शिरीष चौधरी, रमेश बागवे, हुसैन दलवाई, मोहन जोशी, रणजित कांबळे, कैलास गोरंट्याल, बी. आय. नगराळे, शरद अहेर, एम.एम. शेख आणि माणिक जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.