महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मुद्दय़ावरून गुद्दय़ापर्यंत मजल गाठली. या वेळी चांगलीच हाणामारी झाल्याची घटना शनिवारी आयोजित बैठकीत घडली. यानंतर दोन्ही गटांत माफीनामा होऊन प्रकरण मिटले.
महापालिका सभागृहात आयुक्त जयेश सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत स्थायी समितीची बैठक सकाळी सुरू झाली. प्रारंभी ज्येष्ठ नगरसेवक अ‍ॅड. व्यंकट बेद्रे यांनी आयुक्तांना आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी पत्राची प्रत मागितली. पत्र सचिवाकडे असल्याचे सांगत आयुक्तांनी वेळ निभावून नेली. त्यानंतर आमदारांवर झालेल्या शेरेबाजीबद्दल काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत ठिणगी पडली. त्यातून वादावादी सुरू झाली. काँग्रेसचे नगरसेवक दीपक सूळ यांनी आक्रमक होत राष्ट्रवादीचे नगरसेवक विनोद रणसुभे यांच्यावर हल्लाबोल केला. सुनील बसपुरे, राजा मणियार हे राष्ट्रवादीचे नगरसेवकही धावून आले. दीपक सूळ यांच्या मदतीला काँग्रेसचे गिरीश पाटील धावले. ही हाणामारी झाल्यानंतर दोन्ही गटांनी आपापल्या प्रभागातील समर्थकांना संपर्क केल्यामुळे महापालिकेच्या आवारात दोन्ही गटांच्या समर्थकांची गर्दी झाली. ती पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ncp corporator fight
First published on: 09-12-2012 at 01:38 IST