“मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे यांना कसाबने गोळ्या घातल्या नव्हत्या तर आरएसएससी संबधित एका पोलिस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या होत्या. ही माहिती ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवली होती”, असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. “विजय वडेट्टीवार यांचं डोकं फिरलं असून काँग्रेसका हात पाकिस्तान के साथ”, अशी खोचक टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

“मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला. याचे दु:ख काँग्रेसला नाही. कसाबच्या बिर्याणीमुळे अपमान झाल्याचेही ते म्हणाले. यांना कसाबच्या अपमानाची चिंता होती. मात्र, ज्या निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला त्याचे दु:ख काँग्रेसला नाही. वडेट्टीवार यांचं हे विधान दुर्देवी आणि शहिदांचा आपमान करणारं आहे. त्यामुळे या अपमानाचा बदला देशवासीय घेतल्याशिवाय राहणार नाहीत. २६/११ च्या दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी अपेक्षा होती की, याचा बदला घेतला जाईल. मात्र, तेव्हा मोदी पंतप्रधान नव्हते”, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हेही वाचा : काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर; वरिष्ठांच्या भेटीनंतर घेतला ‘हा’ निर्णय

“नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर पुलवामाचा बदला सर्जिकल स्ट्राइक करुन घेतला. मोदींनी दाखवून दिले की, भारत मजबूत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राहुल गांधी यांना मते मागण्याचा अधिकार नाही. आता भारतीय जनात पक्षाने केलेल्या जाहीरातीमध्ये तुमच्या मताचा जल्लोष कुठे व्हायला हवा भारतात की पाकिस्तानात? यामध्ये काँग्रेसचे कुठेही नाव घेतले नाही. असे असताना तक्रार करण्याची गरज काय? काँग्रेसने एवढं मनाला लावून घेण्याचे कारण काय? याचा अर्थ चोराच्या मनात चांदणं. खरं तर काँग्रेस हे पाकिस्तान धार्जिणं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचं हे विधान दुर्देवी असून काँग्रेसची पाकिस्तान धार्जिणी भूमिका देशाला परवडणारी नाही”, अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “काँग्रेसचा हात पाकिस्तानच्या बरोबर आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण जेव्हा-जेव्हा काँग्रेस जिंकते तेव्हा-तेव्हा पाकिस्तानात फटाके फुटतात. जेव्हा-जेव्हा भारताचा क्रिकेटमध्ये पराभव होतो, तेव्हा पाकिस्तानमध्ये फटाके फुटतात. काँग्रेसचे सरकार अनेक वर्ष मूग गिळून गप्प होतं. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, घर में घुसकर मारेंगे”, असे शिंदे म्हणाले.

आरएसएसच्या नसानसात राष्ट्रभक्ती

विजय वडेट्टीवार यांनी उज्जव निकम यांच्यावर केलेल्या विधानावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “आज काँग्रेसच्या बरोबर जे आहेत ते यावर गप्प बसले आहेत. काँग्रेसच्याबरोबर मांडीला मांडी लावून बसायला यांना (उद्धव ठाकरे यांना) थोडंही काही वाटत नाही. उद्धव ठाकरे यांचे नकली हिंदुत्व आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर यांना चांगलं धू-धू धूतलं असतं. त्यांच्या या विधानाचा निषेध करावा एवढा कमी आहे. विजय वडेट्टीवार यांचं डोकं फिरलं आहे. ते आरएसएसची भाषा करतात. मात्र, आरएसएसच्या नसानसात राष्ट्रभक्ती भरलेली असते”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.