काँग्रेस-राष्ट्रवादीत जागांच्या अदलाबदलीची शक्यता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहन अटाळकर, अमरावती</strong>

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटय़ाला आलेल्या अमरावती मतदार संघावर काँग्रेसने दावा केला असताना दुसरीकडे, यवतमाळ-वाशिम मतदारसंघ मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. अकोला, बुलढाण्यातही अशीच स्थिती आहे. पश्चिम विदर्भात जागांच्या अदलाबदलीसाठी स्थानिक नेत्यांपासून ते अनेक वरिष्ठ नेतेही प्रयत्नात असल्याने राजकीय गणितांची नव्याने मांडणी होण्याचे संकेत आहेत.

पश्चिम विदर्भातील चार लोकसभा मतदार संघांपैकी तीन शिवसेनेच्या तर एक भाजपच्या ताब्यात आहे. अमरावती मतदारसंघात गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर-राणा या उमेदवार होत्या. पण, त्यांना पराभव पत्करावा लागला आणि पक्षाला मोठी किंमत मोजावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके हे त्यावेळी पक्षातून बाहेर पडले. गेल्या चार वर्षांमध्ये राष्ट्रवादीची ताकद जिल्ह्य़ात क्षीण झाल्याचे चित्र दिसले. आता संजय खोडके पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परतले आहेत. पण, त्यांना पक्षबांधणीसाठी बरेच परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

खोडके यांनी लोकसभेसाठी पूर्वाश्रमीचे शिवसैनिक दिनेश बूब यांचे नाव पुढे केले आहे. त्याचवेळी काँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा केला आहे. १९९१च्या निवडणुकीपासून काँग्रेसला या मतदारसंघात स्वत:चा उमेदवार उभा करता आला नसल्याने या वेळी ती संधी द्यावी, अशी मागणी जिल्हा आणि शहर काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. तसे ठरावही घेण्यात करण्यात आले आहेत, पण काँग्रेसकडे सध्या तरी सक्षम उमेदवाराची वाणवा आहे. शहराध्यक्ष किशोर बोरकरांसह अनेक जण इच्छुक असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस हा मतदारसंघ सोडणार का, हा कळीचा प्रश्न आहे. भाजप-शिवसेना युती झाल्यास शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ रिंगणात असतील, हे स्पष्ट आहे. पण, त्याच वेळी नवनीत राणा या कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेतील, हे गूढ वाढत चालले आहे.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघही शिवसेनेकडे आहे. भावना गवळी पुन्हा निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे शिवाजीराव मोघे पराभूत झाले होते. मोघे यांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असताना मात्र आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आठ जागांवर वाटाघाटी सुरू आहेत, त्यात यवतमाळ-वाशिम मतदार संघाचाही समावेश असल्याचे कळते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुसदचे आमदार मनोहर नाईक, माजी मंत्री सुभाष ठाकरे ही दोन नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत.

आघाडीत अकोल्याची जागा काँग्रेसच्या वाटय़ाला आहे, पण गेल्या तीन दशकांमध्ये काँग्रेसला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला आहे. १९९८ आणि १९९९ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड.् प्रकाश आंबेडकर यांना साथ देत भाजपकडून ही जागा हिसकावून घेण्यात यश मिळवले होते, पण नंतर आंबेडकर काँग्रेसपासून दूर गेले आणि पुन्हा एकदा भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले. सध्या काँग्रेसकडे या मतदारसंघात प्रभावी चेहरा नसल्याची संधी साधून राष्ट्रवादीने या मतदार संघावर दावा केला आहे. आंबेडकर यांनी एमआयएमसोबत आघाडी केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर पेचप्रसंग उभा ठाकला आहे. दोन्ही पक्षांना आंबेडकर हवे असले, तरी या पक्षांना एमआयएमचे वावडे आहे. आंबेडकर यांनी राष्ट्रवादीला प्रखर विरोध सुरू केला आहे. हे त्रांगडे तूर्तास सुटण्याची चिन्हे नाहीत. राष्ट्रवादीकडून अनेक नावे पुढे करण्यात येत आहेत. भाजपचे खासदार संजय धोत्रे यांनी पुन्हा रिंगणात उतरण्याची तयारी केली असताना त्यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार शोधण्याचे आव्हान विरोधी पक्षांसमोर आहे.

बुलढाणा मतदारसंघात माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव राष्ट्रवादी पुढे करीत आहे. पण, त्यांना याआधी पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे काँग्रेसने या मतदार संघावर दावा केला आहे. काँग्रेसतर्फे आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार राहुल बोंद्रे, माजी मंत्री सुबोध सावजी यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना सामील झाल्यास रविकांत तुपकर यांचे नाव पुढे केले जाऊ शकते. अशा स्थितीत उमेदवारीसाठी स्पर्धा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. बुलढाणा मतदार संघातून शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याशी दोन हात करू शकणारा उमेदवार दोन्ही पक्षांना शोधावा लागणार आहे.

पश्चिम विदर्भातील चारही लोकसभा मतदारसंघांमध्ये सध्या अदलाबदलीचे वारे वाहू लागले असले, तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सक्षम उमेदवारांच्या शोधात आहे. अमरावती मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खासदार आनंदराव अडसूळ यांना टक्कर देण्यासाठी सक्षम असा उमेदवार हवा आहे. नवनीत कौर यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्याची शक्यता धूसर बनली आहे. त्या भाजप आणि काँग्रेसकडूनही प्रयत्नात आहेत. अशा स्थितीत उभय पक्षांना अत्यंत सावधपणे हालचाली कराव्या लागत आहेत. पश्चिम विदर्भ भाजप आणि शिवसेनेच्या ताब्यात आहे. एकेकाळी काँग्रेसचे हुकूमी वर्चस्व या भागावर होते. ते आता नाही, ही काँग्रेसच्या जुन्याजाणत्या नेत्यांच्या मनातील सल आहे.

कोणता मतदारसंघ कोणाला, उत्सुकता शिगेला

गेल्या वेळी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेली मते, प्रतिस्पध्र्याच्या विरोधात वरचढ ठरलेले विधानसभा मतदारसंघ, जातीची उतरंड आदी मुद्दे विचारात घेऊन उमेदवार ठरवले जाणार असले, तरी कोणता मतदारसंघ कोणाच्या वाटय़ाला येईल, याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे. चारही मतदार संघांमध्ये उमेदवारांच्या नावांची चर्चा आहे. यवतमाळ-वाशिममधून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ऐन वेळी एखाद्या तरूणाला उमेदवारी मिळेल काय, अकोला राष्ट्रवादीसाठी सुटणार काय, नवनीत राणा कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार, बुलढाण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला सूर गवसेल काय, असे अनेक प्रश्न चर्चेत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ncp likely to swap seats in west vidharbha
First published on: 13-11-2018 at 02:51 IST