सर्वच राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्यासाठीच लढत असतात, याला काँग्रेस पक्ष अपवाद ठरला आहे. महापालिका निवडणुकीला अवघे १९ दिवस शिल्लक असताना काँग्रेस पक्षातील गटबाजी विकोपाला गेली असून माजी खासदार नरेश पुगलिया व आमदार विजय वडेट्टीवार हे दोन्ही गट एकमेकांना जणूकाही पराभूत करण्यासाठीच रिंगणात उतरले आहेत, असे चित्र निर्माण झाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर जिल्हय़ात १९९६ पर्यंत काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती, मात्र या पक्षाला गटबाजीचे ग्रहण लागले आणि आजची स्थिती अशी आहे की लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत तथा पंचायत समिती अशा सात निवडणुकांत काँग्रेस पक्ष केवळ गटबाजीमुळे पराभूत झाला आहे. पूर्वी माजी खासदार नरेश पुगलिया विरुद्ध वामनराव गड्डमवार व माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे गट सक्रिय होते. आज पुगलिया विरुद्ध विधिमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार या दोन गटांतील वाद विकोपाला गेला आहे. या गटबाजीची सुरुवात महापालिकेतील अर्थकारणातून झालेली आहे. महापालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक २६ नगरसेवक आहेत. याच संख्याबळावर महापालिकेत पहिले अडीच वष्रे काँग्रेसची सत्ता होती. पुगलियांच्या आशीर्वादाने संगीता अमृतकर या महापौर होत्या. मात्र काँग्रेसचे १२ नगरसेवक व पुगलिया यांच्यात काही कारणांवरून वाद झाला. त्याचा परिणाम रामू तिवारी, संतोष लहामगे व माजी महापौर संगीता अमृतकर यांच्या नेतृत्वातील १२ नगरसेवकांचा एक गट फुटला. या गटाने थेट भाजपशी हातमिळवणी केली. बंडखोर गटाच्या राखी कंचर्लावार नंतरच्या अडीच वर्षांसाठी महापौर झाल्या. त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की, महापालिकेत भाजपसोबत गेलेल्या १२ नगरसेवकांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिली तर त्यांच्याविरुद्ध उमेदवार उभे करू आणि स्वत: निवडणुकीतून अंग काढून घेऊ, अशी भूमिका पुगलिया यांनी घेतली आहे. शहर अध्यक्ष नंदू नागरकर सध्या पुगलिया गटात आहेत.  तर वडेट्टीवार यांनी १२ नगरसेवक पक्ष सोडून गेले नाहीत, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. दोन्ही गटांनी एकत्र यावे, असे निर्देश प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शहर काँग्रेस अध्यक्ष नंदू नागरकर यांना दिले होते. त्यानुसारच नागरकर यांनी राजीव गांधी कामगार भवनात दुसऱ्यांना पक्ष निरीक्षक शिवाजीराव मोघे व आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या उपस्थितीत मुलाखतींचे आयोजन केले. परंतु विजय वडेट्टीवार व महापलिकेत भाजपसोबत गेलेल्या १२ नगरसेवकांच्या गटाने याला सुरुंग लावला. त्याचा परिणाम वडेट्टीवार यांनी परिचय मेळावा, तर पुगलियांनी मुलाखती असे दोन वेगवेगळे कार्यक्रम घेतले.

१२ नगरसेवकांना उमेदवारी देणारच

महापालिकेत १२ नगरसेवक भाजपासोबत सत्तेत सहभागी असले तरी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. त्यामुळे आजही ते काँग्रेस पक्षाचे नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना उमेदवारी द्यावी यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे आग्रह धरणार आहे. पक्षाचा कुठलाही वरिष्ठ नेता १२ जणांचा विरोध करीत असेल तरी त्यांना उमेदवारी मिळवून देणे आपले कर्तव्य आहे. महापालिका निवडणुकीसाठी पुगलिया व आपण लवकरच एका मंचावर येणार आहोत. त्यामुळे मनपा निवडणुकीत गटबाजी राहणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

पुगलियांचा इशारा

भाजपसोबत सत्तेत सहभागी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना प्रदेशाध्यक्ष, पक्ष निरीक्षकांनी उमेदवारी दिली तर त्यांची थेट सोनिया गांधी व राहुल गांधींकडे तक्रार करणार, १२ नगरसेवकांवर अपात्रतेबाबतच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी सुरू आहे. त्याचा निकाल लवकरच येणार आहे. सोबतच मालमत्ता करवाढ आणि इतर जनहिताचे निर्णय भाजप व या १२ नगरसेवकांनी घेतले नाहीत. त्यामुळे काँग्रेसने उमेदवारी दिली तर पक्षाचे नुकसान होईल. तेव्हा १२ जणांना उमेदवारी देऊ नये, अन्यथा त्यांच्या विरुद्ध उमेदवार उभे करण्याचा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी दिली आहे. वडेट्टीवार व धोटे यांनी १२ जणांची नावे सोडून ज्यांना उमेदवारी द्या म्हणतील त्यांना देण्यास तयार असल्याचेही पुगलिया म्हणाले.

ज्या १२ नगरसेवकांमुळे काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे त्यात सभागृह नेते रामू तिवारी, सभापती संतोष लहामगे, माजी महापौर संगीता अमृतकर, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा अनिता कथडे, दुर्गेश कोडाम, राजेश अडूर, सुनीता अग्रवाल, ऐस्तर शिरवार, मेहर दत्तू सिडाम, करीमलाला काझी, अनिल रामटेके व कश्यप यांचा समावेश आहे. यातील अनिल रामटेके यांनी बसपात प्रवेश केला आहे. तर कथडे व शिरवार दोन्ही गटांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे १२ जणांचा गट आता ८ वर आलेला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress party in chandrapur municipal corporation elections
First published on: 31-03-2017 at 01:58 IST