सांगली : काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून उद्या, बुधवारी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी रात्री ही घोषणा केली.
सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविलेले शहर जिल्हाध्यक्ष पाटील हे गेल्या सहा महिन्यांपासून काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेबद्दल नाराज होते. निवडणुकीत आपल्या विरुध्द बंडखोरी करणाऱ्या श्रीमती पाटील यांच्यावर कारवाईची मागणी करत असताना अन्य माजी पदाधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची त्यांची मागणी होती. मात्र, खासदार विशाल पाटील यांच्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा त्यांचा आक्षेप होता.
भविष्यात खासदार गटाकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही याची खात्री वाटत असल्याने आणि पक्ष नेतृत्वाकडून ताकद मिळत नसल्याने ते भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. श्रीमती पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्या प्रवेशाला स्थानिक पातळीवर विरोध झाला. मात्र, पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी स्थानिक नेत्यांचा विरोध डावलून त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
सोमवारी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष आमदार चव्हाण, पालकमंत्री पाटील व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी श्री. पाटील यांच्या निवासस्थानी भोजनासाठी जाऊन पाटील यांच्या पक्षप्रवेशाबाबत अंतिम बोलणी केली. यावेळी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, नीता केळकर, शेखर इनामदार यांच्यासोबत जन सुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पाटील यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा करताना सांगितले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुद्द्यावर पक्षप्रवेश करणाऱ्यांचे पक्षात स्वागतच करण्यात येईल. पृथ्वीराज पाटील यांच्यासारख्या सामाजिक जाण असलेल्या कार्यकर्त्यांना पक्षात नेहमीच सन्मान दिला जाईल. सांगलीचा विकास करण्यासाठी ते सुचवतील ती विकासकामे प्राधान्याने करण्याचा भाजप प्रयत्न करेल.
यावेळी श्री. पाटील म्हणाले, मी सांगलीच्या विकासाचा झेंडा घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये सन्मान दिला जाईल, असा विश्वास नेत्यांनी दिला आहे. माझ्यासाठी सांगलीचा विकास हाच प्राधान्यक्रम असणार आहे. यावेळी भाजप नेत्यांचे पाटील व त्यांचे कुटुंबीय विजया पाटील, वीरेंद्र पाटील यांनी स्वागत केले.