शिवसेनेला समर्थन देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस सकारात्मक असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्यावरुन पक्षात दोन गट आहेत. काही नेत्यांचं अद्यापही काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊ नये असं मत आहे. काँग्रेसच्या या निर्णयावर काही कार्यकर्तेही नाराज आहेत. नगर जिल्ह्यातील संगमनेरच्या मुस्लिम युवक कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींना पत्र पाठवून सत्तेसाठी शिवसेनेशी आघाडी करू नका अशी विनंती केली आहे. त्यांनी सोनिया गांधींना यासंबंधी पत्र लिहिलं आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ असलेल्या संगमनेरमधील या संघटनेच्या १०० कार्यकर्त्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्रात लिहिण्यात आलं आहे की, “शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षासोबत आघाडी करण्याची पदाधिकाऱ्यांची भाषा म्हणजे एक प्रकारे मुस्लिम समाजाची फसवणूक असून काही पदाधिकाऱ्यांच्या स्वार्थी हेतूपोटी शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षासोबत जाऊन पक्षाचे नुकसान करुन घेऊ नका”.

“देशाच्या किंवा राज्याच्या राजकीय वाटचालीत काँग्रेस पक्षाच्या धर्मनिरपेक्ष विचाराला साथ व पाठबळ देऊन मुस्लिम समाजाने पक्षाच्या धोरणाला नेहमीच पाठबळ दिले. देशातील राजकीय वातावरण वेगळ्या दिशेने जाणारे असले तरी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तसंच यापुर्वी संगमनेर तालुक्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने नेहमी काँग्रेस नेहमीच काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांना विजयी केले आणि शिवसेना भाजपासारख्या जातीयवादी पक्षांचा व विचारांचा पराभव केला,” असंही या पत्रात म्हटलं आहे.

यावेळी पत्रातून काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब असून पदाधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे मुस्लिम समाज पक्षापासून दूर जाईल असा इशारा देण्यात आला आहे. मुस्लिम समाजात मोठया प्रमाणात नाराजी निर्माण होत असून, पक्ष पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेसोबत आघाडी करण्याची कृती म्हणझे मुस्लिम समाजाची एकाप्रकारे फसवणूक असल्याची भावना पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress sonia gandhi ahmednagar muslim letter shivsena uddhav thackeray maharashtra political crisis sgy
First published on: 21-11-2019 at 12:36 IST