विधान परिषदेच्या दहा जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीत एकूण २८५ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. मात्र पाच वाजून गेल्यानंतरही अद्याप मतमोजणीला सुरुवात झाली नाही. भारतीय जनता पार्टीचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

दोघांनीही निवडणूक प्रक्रियेचं उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. याबाबतची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली असता, त्यांनी काँग्रेसची मागणी फेटाळून लावली आहे. त्यानंतर काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिल्लीत बैठक सुरू आहे. काँग्रेसकडून करण्यात आलेल्या तक्रारीबाबत निकाल लागल्याशिवाय मतमोजणीला सुरुवात होणार नसल्याची माहिती समजत आहे. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेच्या मतमोजणीला विलंब होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एक ट्वीट करत मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचे मत बाद ठरवावीत, अशी मागणी केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “निवडणूक आयोगाच्या कलम ३७ (अ) नुसार मतदाता आंधळा, अशिक्षित किंवा वृद्धापकाळामुळे मतदान करण्यास असमर्थ असेल, तर तो १८ वर्षांवरील वाचू शकणाऱ्या व्यक्तीची मतदानासाठी मदत घेऊ शकतो. पण येथे अशी परिस्थिती नव्हती. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी स्वत: सही करुन मतपत्रिका घेतली होती. त्यामुळे त्यांचे मत बाद केले पाहिजे.”

दुसरीकडे, दोघांनीही मतदान करण्यासाठी सहायक मिळावा याबाबतची परवानगी निवडणूक आयोगाकडून घेतली होती, असा दावा भाजपाकडून केला जात आहे. याबाबतचे पूर्व परवानगीचे कागदपत्रेही भाजपाने राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचं समजत आहे.

खरंतर, भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप सध्या आजारी आहेत. मुक्ता टिळक यांना कर्करोगाचं निदान झालं आहे. दोघंही आजारी असताना आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी आले होते. पण यावेळी त्यांनी स्वत: मतदान न करता दुसऱ्यांकडून मतदान करून घेतलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला असून याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेचा निकाल लागण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.