भारतीय जनता पक्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रवेश केल्यानंतर काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी मला उद्धव ठाकरेंचं निवासस्थान मातोश्रीवरुन तब्बल २५ वेळा फोन आल्याचं सांगत विजय वडेट्टीवार यांनी खळबळ उडवून दिली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगल्यावरुनही दोन वेळा फोन आल्याचं सांगितलं.

विजय वडेट्टीवार चंद्रपूर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “शिवसेनेकडून मला पक्षांतरांसाठी वारंवार फोन येत आहेत. आधीच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेले आहेत. त्यामुळे दुसरा विरोधी पक्षनेता शिवसेनेला त्यांच्या पक्षात न्यायचा आहे. यासाठी मला मातोश्रीवरुन २५ फोन आले. मात्र मी तो उचलला नाही”, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

तसंच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरुनही मला फोन आला होता. पण मी फोन उचलून जिथे आहे तिथे खूप असल्याचं त्यांना सांगितलं असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना बुधवारी भाजपात प्रवेश देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक या सगळ्यांचा भाजपा प्रवेश झाला. तसेच काँग्रेसचे नेते कालिदास कोळंबकर यांचाही भाजपात प्रवेश झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.