‘कापसाला सात हजार रूपये भाव द्यावा, धुळे आणि शिंदखेडा तालुक्यात कापूस खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे, स्वस्त धान्य दुकानातून डाळींचे वाटप करावे,’ या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी शुक्रवारी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अडविला.
नंदुरबार जिल्हा दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांचे शुक्रवारी सकाळी शिरपूर विमानतळावर आगमन झाले. विमानतळापासून त्यांच्या वाहनांचा ताफा नंदुरबारकडे रवाना झाला. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर कार्यकर्त्यांसह शिरपूर विमानतळावर पोहोचले. पोलीस प्रशासनाच्या संमतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यावयाचे असल्याचे सांगत त्यांनी पोलीस प्रशासनाकडून वेळ मागून घेतली. त्यानंतर शिंदखेडय़ाचे आ. जयकुमार रावल यांचे आगमन झाले. विमानतळावर निवेदन देता येणार नाही. त्यामुळे तुम्ही निघून जा, असे त्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सुनावले. सनेर यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यानंतर विमानतळापासून काही अंतरावर असलेल्या दहीवद फाटय़ाकडे धाव घेत मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडविला. अचानक वाहने अडविले गेल्यामुळे सुरक्षा यंत्रणेचा काहीसा गोंधळ उडाला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे ताफ्यातील गाडीतून सनेर यांच्याजवळ आले. निवेदन स्वीकारत शेतकऱ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यानंतर ताफा मार्गस्थ झाला.
संग्रहित लेख, दिनांक 24th Oct 2015 रोजी प्रकाशित
काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविला
नंदुरबार जिल्हा दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांचे शुक्रवारी सकाळी शिरपूर विमानतळावर आगमन झाले.
Written by रत्नाकर पवार

First published on: 24-10-2015 at 06:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress workers stop cms car