नक्षल चळवळीच्या प्रभावक्षेत्रात खनिज उत्खननासाठी इच्छुक असलेल्या उद्योगांशी व्यवहार करण्याच्या मुद्दय़ावरून जहाल नक्षलवादी नर्मदा व ऐतू यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले असून, आता हा वाद केंद्रीय समितीपर्यंत पोहचला आहे. लॉयड स्टीलचे उपाध्यक्ष धिल्लन यांच्या हत्येची पाश्र्वभूमी या वादाला कारणीभूत असल्याचे समजते.
नक्षलवाद्यांनी अलीकडच्या दोन दशकांत आदिवासी समाज सोबत असावा म्हणून जल, जमीन, जंगल व त्यात असलेल्या खनिजांवर आदिवासींचा हक्क असल्याची भूमिका घेत चळवळीच्या प्रभाव क्षेत्रात उद्योग सुरू करण्याची इच्छा असलेल्या भांडवलदारांना विरोध करणे सुरू केले आहे. काही वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने मध्य भारतातील जंगलात कोणतेही खनिज उत्खनन करण्यास विरोध दर्शवणारा ठराव मंजूर केला होता. या ठरावाचे पालन चळवळीतील सर्व सदस्यांनी करावे असे निर्देश देण्यात आले असले, तरी या मुद्दय़ावर चळवळीतील जुन्या सदस्यांची मते वेगळी असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. या पाश्र्वभूमीवर जहाल नक्षलवादी नर्मदा व दक्षिण गडचिरोलीचा विभागीय सचिव ऐतू यांच्यात सुरू झालेल्या वादाने आता गंभीर वळण घेतले आहे.
गेल्या जून महिन्यात ऐतूने एटापल्लीतील सूरजागड भागात लोहखनिजाच्या खाणीची परवानगी मिळालेल्या लॉयड स्टील या कंपनीचे उपाध्यक्ष जसपालसिंग धिल्लन यांना चर्चेसाठी बोलावले व त्यांची तसेच त्यांच्यासोबत असलेल्या दोघांची हत्या केली. धिल्लन यांनी खंडणीची मोठी रक्कम सोबत नेली होती व ती मात्र नक्षलवाद्यांनी ठेवून घेतली, अशी माहिती नंतर समोर आली. एकीकडे खाणीला विरोध दर्शवायचा आणि दुसरीकडे त्याच खाण उद्योगांकडून खंडणी वसूल करून हत्या करण्याचा प्रकार नक्षलवाद्यांनी पहिल्यांदाच केला होता.
खाणींसाठी इच्छुक असणाऱ्या उद्योगांना चर्चेसाठी बोलवायचे, त्यांच्याकडून खंडणी गोळा करायची आणि नंतर खाणीचा मुद्दा गावकऱ्यांवर सोडून द्यायचा, अशी भूमिका ऐतूने घेतली आहे. त्यातूनच धिल्लन यांच्या हत्येचा प्रकार घडला. जहाल नक्षलवादी नर्मदाने ऐतूच्या या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. अशी भूमिका घेतली तर चळवळीला आजवर मिळत असलेला गावकऱ्यांचा पाठिंबासुद्धा मिळणार नाही, असे नर्मदाचे म्हणणे आहे. विभागीय समितीच्या बैठकीत यावरून नर्मदा व ऐतूमध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. गावकऱ्यांना रोजगार मिळत असेल तर खाणींना विरोध नको, अशी भूमिका नर्मदाने आरंभापासून घेतली आहे. मात्र, केंद्रीय समितीने ठराव केल्यामुळे नर्मदाला ही भूमिका पुढे रेटता आली नाही. या पाश्र्वभूमीवर ऐतूने खंडणी उकळण्यासोबतच धिल्लनसह तिघांना ठार केल्याने संतप्त झालेल्या नर्मदाने आता हा वाद केंद्रीय समितीकडे नेल्याची माहिती आहे.
ऐतूचे वारंवार खटके
आधी छत्तीसगडमध्ये सक्रिय असलेला ऐतू दक्षिण गडचिरोलीत आल्यापासून त्याचे चळवळीतील इतर सहकाऱ्यांसोबत वारंवार खटके उडत आहेत. यातूनच जहाल नक्षलवादी शेखरने आत्मसमर्पण केले होते. आता नर्मदासोबतही त्याचा वाद झाल्याने हे प्रकरण गंभीर झाले आहे.