नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी १० तालुक्यांमध्ये आतापर्यंत करोना विषाणूचा शिरकाव झाला असून, शुक्रवारी आणखी ११ नवे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या आता ७६९ वर पोहचली आहे. त्यात मालेगावातील ६१६ रुग्णांचा समावेश आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीस पहिल्यांदा निफाड तालुक्यातील लासलगाव येथील एका तरुणास करोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर सहा एप्रिल रोजी नाशिकच्या गोविंद नगरातील व्यक्ती बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. पाठोपाठ आठ एप्रिल रोजी मालेगावातील चार व चांदवड येथील एक असे पाच जण एकाच दिवशी करोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने जिल्हा हादरला होता. त्यानंतर मालेगावात जवळपास रोजच नवे रुग्ण आढळून येत असून गेल्या सव्वा महिन्याच्या कालावधीत शहरात ६०० व ग्रामीण भागात १६ असे एकूण ६१६ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

प्रारंभी केवळ तीन-चार तालुक्यांपुरता सिमीत असलेला करोनाचा हळूहळू जिल्ह्यातील पंधरा पैकी दहा तालुक्यांमध्ये शिरकाव झाल्याने नाशिक जिल्ह्याची चिंता वाढली झाली आहे. यातील सर्वाधिक ६१६ रुग्ण संख्या मालेगावची असून त्यानंतर नाशिक तालुका ५०, येवला ३३, निफाड १३, दिंडोरी ९, सिन्नर ७, चांदवड ४,नांदगाव ४, सटाणा २ व कळवण १ अशी रुग्ण संख्या आहे. त्र्यंबकेश्वर, देवळा, इगतपुरी, पेठ व सुरगाणा या पाच तालुक्यांमध्ये सुदैवाने एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

शुक्रवारी दोन टप्प्यात जिल्ह्यात एकूण १९५ चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यात ११ अहवाल सकारात्मक असून १८४ नकारात्मक आले आहेत. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मालेगावातील समता नगर मधील दोन पुरुष, एकता नगर मधील एक पुरुष, सावता नगर मधील महिला, हिम्मतनगर मधील पुरुष तसेच शहरातील अन्य दोघा पुरुष रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील एक महिला व इंदोर येथील दोन पुरुष आणि सिन्नर तालुक्यातील एक पूरुष रुग्ण करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.