एजाजहुसेन मुजावर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाबाधित रुग्ण आणि मृतांच्या संदर्भातील माहिती स्थानिक प्रशासनाकडून पोर्टलवर भरण्यात येते. राज्य शासनाने केलेल्या फेरतपासणीत राज्यात १३२२ करोनाबाधित मृतांची संख्या वाढल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले होते. यात सोलापुरातील मृतांमध्ये ५१ने वाढ झाल्याचेही समोर आले होते. परंतु सोलापूरच्या प्रशासनाने ही बाब नाकारत आपण यापूर्वी दिलेली माहितीच खरी असल्याचा दावा केला होता. आता सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रशासनातील समन्वयाच्या अभावाचे कारण पुढे करीत करोनाबाधित मृतांची संख्या ४०ने वाढल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. ही जास्त वाढलेली मृतांची संख्या ४० एवढीच आहे की, यापूर्वी राज्य शासनाने जाहीर केलेल्या जास्तीच्या ५१ मृतांचा आकडा खरा आहे, याचे गौडबंगाल आहे. मृतांप्रमाणेच करोनाबाधित रुग्णसंख्येचीही फेरपडताळणी करण्याची गरज आहे.

बुधवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सोलापुरात येऊन करोना विषाणू संसर्ग परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.  त्याअगोदरच सोलापुरात करोनाबाधित मृतांच्या संख्येचा गोंधळ उजेडात आला आहे.

सोलापूर शहरात १९५७ तर जिल्हा ग्रामीणमध्ये २०४ अशी एकूण २१६१ करोनाबाधित रुग्णसंख्या होती, तर मृतांचा शहरातील १७० आणि ग्रामीणमधील ११ याप्रमाणे प्रशासनाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आला होता. त्यात शहरात आणखी तीन मृत वाढून मृतसंख्या १७३ वर गेली असतानाच अचानकपणे पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यात आतापर्यंतच्या एकूण करोनाबाधित मृतांमध्ये ४०ने वाढ जाहीर केली. त्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधित मृतांची संख्या २१३ वर गेली आहे. यात शहरातील एकूण मृत्यूचे प्रमाणही ८.८४ टक्क्यांवरून आता १०.८८ पर्यंत वाढला आहे.

करोनाबाधित मृतांचा ४०ने वाढलेला आकडा प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे मागील दोन महिन्यांत त्या-त्या वेळी नोंद करून करायचा राहून गेला होता. मात्र हा हलगर्जीपणा असून त्याबद्दल प्रशासनातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह रुग्णालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याचेही स्पष्टीकरण देत, पालिका आयुक्त शिवशंकर यांनी आपण काही तरी कारवाई हाती घेतोय, हे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या तरी मुख्य जबाबदारी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाची आहे. त्याबद्दल कोण आणि कशी कारवाई करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आता कारवाई कुणावर?

आणखी गांभीर्याची बाब म्हणजे यापूर्वी १६ जून रोजी शासनाने राज्यातील करोनाबाधित मृतांच्या संख्येची फेरपडताळणी करून त्यात मृतांची १३२२ संख्या वाढविली असता त्यात सोलापुरातील ५१ मृतांचा समावेश होता. परंतु त्या वेळी इकडे स्थानिक प्रशासनाने ही वाढीव ५१ मृतसंख्या नाकारत, आपण आतापर्यंत दिलेली मृतांची संख्याच खरी असल्याचा दावा केला होता. म्हणजे एकीकडे शासनाचे मुख्य सचिव अजोय मेहता हे सोलापूरच्या वाढीव ५१ मृतांची माहिती जाहीर करतात आणि दुसरीकडे सोलापूरचे प्रशासन मुख्य सचिवाची माहिती नाकारते. यात मुख्य सचिव खरे की सोलापूरचे प्रशासन खरे, असा सवाल उपस्थित झाला असताना अखेर उशिरा का होईना, सोलापुरातील करोनाबाधित मृतांचा आकडा ४०ने वाढल्याचे पालिका आयुक्त शिवशंकर हे मान्य करतात. एकूण या गंभीर प्रकरणात आता कोणाचा तरी बळी दिला जाईल, असे वाटते.

नेमक्या संख्येबाबत संभ्रम

प्रशासकीय चुकांमुळे मृतांची संख्या वेळच्या वेळी संकलित होऊ शकली नाही. महापालिकेतील कोविड नियंत्रण कक्षातील संबंधित कर्मचारी रजेवर गेला. दुसऱ्या कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाली. त्याच वेळी आरोग्याधिकाऱ्यालाही बदलण्यात आले. यामुळे एकमेकांशी समन्वय तथा संपर्क होऊ शकला नाही. यात पाठपुरावा करण्यातही यंत्रणा कमी पडली, असे आयुक्त शिवशंकर हे मान्य करतात. मात्र यात एक बाब महत्त्वाची ठरते की, करोनाबाधित रुग्ण मृत्युमुखी पडल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे न सोपविता महापालिका यंत्रणेकडूनच त्या मृतदेहाचा अंत्यविधी उरकला जातो. दहन व दफन केलेल्या करोनाबाधित मृतांच्या संख्या पाहिली असता त्यातही गोंधळ दिसून येतो. एकूण मृतांच्या प्राप्त संख्येनुसार जवळपास ९० टक्के मृतांचे मोरे विद्युत दाहिनीमध्ये दहन करण्यात आले असून केवळ १० टक्के मृतदेहांचेच दफन झाले आहे. वास्तविक पाहता दफन झालेल्या मृतांची संख्याही लक्षणीय आहे. या विसंगतीकडेही प्रशासनाने लक्ष दिले असते तरी मृतांच्या संख्येतील तफावत समोर आली असती.

सद्य:स्थितीत महापालिका प्रशासनाने करोनाबाधित मृतांची संख्या ४०ने वाढल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात ही वाढीव संख्या तरी खरी आहे काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona related deaths rise in solapur abn
First published on: 24-06-2020 at 00:25 IST