मुंबई : राज्यात गणेशोत्सवाच्या काळात करोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका वर्तविला गेला असला तरी प्रत्यक्षात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. सध्या राज्यातील ७३ टक्के रुग्ण पुणे, ठाणे, नगर, मुंबई आणि सातारा जिल्ह्य़ांत आहेत.

 गणेशोत्सवाच्या काळात झालेल्या गर्दीमुळे बाधितांची संख्या वाढेल असा अंदाज होता. परंतु गणेशोत्सवानंतर आता आठवडा उलटला आहे. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत या आठवडय़ात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत सुमारे २३ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच दैनंदिन रुग्णसंख्याही साधारण चार हजारांवरून साडेतीन हजारांवर आली आहे.

राज्यात सर्वाधिक ९,४१६ रुग्ण सध्या पुण्यात उपचाराधीन आहेत. त्या खालोखाल ठाणे ५८९६, मुंबई ५२७६, नगर ५०८५ आणि साताऱ्यामध्ये २,५६० रुग्ण आहेत. 

सध्या दुसरी लाट ओसरत आहे असे म्हणता येईल. त्यामुळेच शाळेसह, मंदिर, सिनेमागृह टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. वेगाने होत असलेले लसीकरण आणि अधिकाधिक नागरिकांमध्ये प्रतििपडे असल्याचे सेरो सर्वेक्षणात आढळले आहे, असे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

रायगड, नाशिकमध्ये किंचित वाढ

राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या दहा जिल्ह्य़ांमध्ये उपचाराधीन रुग्णसंख्यचे प्रमाण कमी झाले असले तरी रायगड आणि नाशिकमध्ये मात्र किंचित वाढ झाल्याचे दिसत आहे. 

नगरमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या ७०० वर

राज्यात सध्या सर्वाधिक दैनंदिन रुग्ण नगर जिल्ह्य़ात आढळत असून प्रतिदिन साधारण ७०० रुग्णांची भर पडत आहे. त्या खालोखाल पुणे, ठाणे आणि मुंबईमध्ये रुग्ण आढळत आहेत.

बाधितांच्या प्रमाणातही घट, सिंधुदुर्गमध्ये वाढ

बाधितांचे प्रमाण घटले आहे. आता एकाही जिल्ह्य़ात हे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा अधिक नाही. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात सर्वाधिक ५.८२ टक्के बाधितांचे प्रमाण पुण्यात होते. त्या खालोखाल नगर ५.५२ टक्के, सांगली ३.८८ टक्के, नाशिक ३.७६ टक्के आणि साताऱ्यातील प्रमाण ३.५६ टक्के होते. तिसऱ्या आठवडय़ात मात्र हे प्रमाण कमी झाले असून राज्यात सर्वाधिक ४.७८ टक्के बाधितांचे प्रमाण नगरमध्ये आहे. त्या खालोखाल पुणे ४.६२ टक्के), सांगली(३.९७ टक्के), सिंधुदुर्ग (३.४६ टक्के) यांचा समावेश आहे. नगर, पुणे, नाशिक आणि साताऱ्यात बाधितांचे प्रमाण कमी झाले असले तरी सांगली आणि सिंधुदुर्गामध्ये मात्र वाढले आहे. सिंधुदुर्गात तर ते आठवडय़ाभरात ३ टक्क्यांवरून ३.४६ टक्क्यावर गेले आहे.

तिसरी लाट डिसेंबर-जानेवारीत?

गणेश उत्सवात रुग्णसंख्येत फारशी वाढ झाल्याचे आढळले नाही. सर्वसाधारणपणे दोन लाटांमध्ये १०० दिवसांचे अंतर असते. सणांच्या काळात थोडय़ा प्रमाणात रुग्णसंख्या वाढेल, परंतु आता तिसरी लाट डिसेंबर-जानेवारीदरम्यान येण्याची शक्यता आहे, असे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

उपचाराधीन रुग्ण

      १४ सप्टेंबर     २५ सप्टेंबर

राज्य   ४९,६७१       ३७,९८४

पुणे    १३,१०१       ९,४१६

ठाणे    ७,२५३        ५,८९६

नगर   ६,८९८       ५,०८५ 

मुंबई   ५,३९३        ५,२७६

सातारा  ४४७४        २५६०