ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ज्या कोल्हापूरने दोनवेळा पदवीधर मतदारसंघातून आमदार केलं, नंतर मंत्रीपदार्यंत गेले त्या कोल्हापूरमधील माणसं जगली की मेली हे तरी बघायला पाटील यांनी यावं असा टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे. गुरुवारी कोल्हापूरमधील शासकीय विश्रामगृहामध्ये राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट आणि डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना फेस शिल्डचे वाटप करण्यात आले. या वितरणाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ यांनी पाटील यांच्यावर टीका केली.

“चंद्रकांत पाटील यांची मुलाखत मी ऐकली. या मुलाखतीमध्ये दोन ते तीन वेळा कोल्हापूरचा उल्लेख आला. गेल्या ५० दिवसांमध्ये कोल्हापूरमधील माणसं काय करत आहेत. ती जगली की मेली हे सुद्धा पहायला पाटील आले नाहीत,” असे मत मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना नोंदवले. सत्तेत असतो तर अधिक चांगलं काम केलं असतं असं म्हणणाऱ्या पाटील यांनी सर्वात प्रथम कोल्हापूरमध्ये यावं. सर्व पातळ्यांवर कोल्हापूरमध्ये कशापद्धतीने काम सुरु आहे हे पहावं, असं आवाहन मुश्रीफ यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना केलं आहे.

आणखी वाचा- एकनाथ खडसे-भाजपा राजकीय वादावर नितीन गडकरींनी सोडलं मौन; म्हणाले…

मागील वर्षी कोल्हापूर आणि परिसरात आलेल्या महापुराच्या वेळी भाजपाने चांगलं काम केल्याचा दावा करणाऱ्या पाटील यांच्यावर मुश्रीफ यांनी या मुद्द्यावरुनही टीका केली. “जेव्हा चिखलीमध्ये पुराचे पाणी शिरत होते तेव्हा मुख्यमंत्री आणि यांची (चंद्रकांत पाटील यांची) महाजनदेश यात्रा सुरु होती. माणसं बुडायला लागल्यानंतर यात्रा सोडून कोल्हापूरला या असं आवाहन मी त्यांना केलं होतं. त्यानंतर ते किती दिवसांनी आले, त्यांची टर कशापद्धतीने उडवली गेली. त्यानंतर त्यांना काढता पाय घ्यावा लागला हे सर्व येथील जनतेला ठाऊक आहे,” असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

आणखी वाचा- जगायचं आहे, तर आणखी कर्ज घ्या; मोदी सरकारच्या पॅकेजवर काँग्रेसची टीका

या महापुरात मेलेल्या जनावरांचा शाप लागल्याचेही मुश्रीफ यांनी पाटील यांच्यावर टीका करताना म्हटलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि अनुदान देण्यासारख्या गोष्टीही आम्ही सत्तेत आल्यानंतर झाल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला. चंद्रकांत पाटील मंत्री असताना त्यांनी कोल्हापूरात अनेकांना लक्ष्मीदर्शन घडवले. आता करोनाच्या काळात त्यांनी कोल्हापूरमध्ये येऊन गरिबांना लक्ष्मीदर्शन घडवावं असा टोलाही मुश्रीफ यांनी पाटील यांना लगावला.