नवसंकल्पना, संशोधनाला बळ

मायलॅब सोल्यूशन्स या कं पनीने करोना चाचण्यांसाठीचा स्वदेशी संच विकसित केला

करोनाविषयक बातम्यांच्या महापुरात राज्यातील विविध भागांमधील काही वेगळे कल, वेगळी निरीक्षणे, वेगळे उपक्रम, लक्षवेधी बदल अशांची दखल घेणारे नवे वृत्तसदर.

करोना संसर्गामुळे अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मार्चच्या अखेरीपासूनच करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय विकसित करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. संशोधन संस्था, नवसंकल्पक, नवउद्यमी यांनी निर्जंतुकीकरण द्राव (सॅनिटायझर) ते चाचणी संचापर्यंत अनेक साधने विकसित के ली. एका अर्थाने करोना संसर्ग हा संशोधन, नवसंकल्पनांना बळ देणारा ठरला.

मायलॅब सोल्यूशन्स या कं पनीने करोना चाचण्यांसाठीचा स्वदेशी संच विकसित केला. तसेच राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्हीने) प्रतिपिंड चाचणी संच (अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट किट) विकसित केला. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेंतर्गत (एनसीएल) असलेल्या ‘व्हेंचर सेंटर’ या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून चेहरा झाकण्यासाठी फेसशिल्ड, अतिनील किरणांचा (अल्ट्राव्हायोलेट रेंज) वापर करून निर्जंतुकीकरण यंत्राची निर्मिती करण्यात आली. पोलीस, प्रशासन आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना एक लाखांहून अधिक फेसशिल्डचे वाटप झाले. तसेच एन९५ मास्कच्या धर्तीवर एमएच१२ ही मुखपट्टीही विकसित करण्यात आली. एनसीएलने आरटीपीसीआर चाचण्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या नमुन्यांसाठीच्या स्वॅबची निर्मिती केली. संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचा हा स्वॅब आहे.

भारतीय विज्ञान शिक्षण संशोधन संस्था (आयसर) आणि आंतरविद्यापीठ खगोल भौतिकी केंद्राच्या (आयुका) शास्त्रज्ञांनी अन्य काही संस्थांच्या मदतीने पूर्णपणे यांत्रिक कृत्रिम श्वसन यंत्रणेची संगणकीय रचना तयार केली. ‘भरुचा व्हेंटिलेटर’ या नावाने ही प्रसिद्ध रचना गेली काही वर्षे रुग्णालयांमध्ये वापरात असून, या कृत्रिम श्वसन यंत्रणेच्या स्थानिक स्तरावरील निर्मितीसाठी नवी संगणकीय रचना खुली करण्यात आली आहे. कृत्रिम श्वसन यंत्रणा तयार करण्यासाठी सात हजारांपेक्षा कमी खर्च येतो. तर सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून जवळपास दहा हजार लिटर आणि २५ लाखांहून अधिक मुखपट्टय़ा तयार करून वाटल्या.

टोसिलिझुमॅबच्या वापरात घट!

करोनाविरोधात लढण्यासाठी शरीरामध्ये निर्माण होणारे सायटोकाइन स्ट्रॉम नियंत्रित करण्यासाठी ‘टोसिलिझुमॅब’ या इंजेक्शनचा होणारा वापर सप्टेंबर महिन्यात कमी झाला आहे. या इंजेक्शनची किंमत ३२ हजार ५०० रुपये एवढी होती. त्यामुळे त्याची उपलब्धता आणि वापर यावरही पूर्वी मर्यादा होत्याच. दरम्यानच्या काळात सौम्य अवस्थेतील रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा अधिक लाभ होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सप्टेंबरमध्ये ‘टोसिलिझुमॅब’चा वापर कमी होत असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात. यामुळे खर्चाच्या प्रमाणात काही घट होईल असे चित्र दिसते, पण हे वरवरचे आहे. कारण रेमडेसिवीर या औषधांचा तुटवडा एवढा आहे, की दोन हजार ८५० रुपयांचे हे इंजेक्शन दहा हजार ८०० रुपयांपर्यंत विकले गेले. मात्र पूर्वी प्रतिदिन ३० टोसिलिझुमॅब इंजेक्शनची असलेली मागणी आता एक किंवा दोनवर आल्याचे औषध विक्री आणि नियंत्रणावर नजर ठेवून असणारे अधिकारी सांगतात. या औषधांना पर्यायी औषधेही उपलब्ध आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Coronavirus in maharashtra coronavirus news update from maharashtra zws