पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशामध्ये २१ दिवस लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. यासंदर्भातील माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनीच ट्विटर तसेच फेसबुकवरुन लाइव्ह व्हिडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना दिली. जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन हे जनतेच्या सुरक्षेसाठी असल्याचे सांगतानाच यामुळे घाबरुन जाण्याची गरज नसल्याचे म्हटलं आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पंतप्रधानांनी लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर माझं त्यांच्याशी बोलणं झालं. मी पंतप्रधानांशी बोललो आणि त्यांना कल्पना दिली की तुम्ही दिलेल्या सूचना आम्ही आधीच राज्यात दिल्या आहेत. जवळपास महाराष्ट्र आम्ही लॉकडाउन केला आहे. पण अत्यावश्यक सेवा आणि त्यासाठी लागणारे कर्मचारी आपल्याला ठेवावे लागतील अन्य़था गोंधळ निर्माण होईल” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यावेळी “युरोपमध्ये संकट ओढावल्यानंतर काय वातावरण होतं याची कल्पना मला मोदींनी दिली”, असंही मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले.

“आपण पाहत आहात, ठिकठिकाणाहून बातम्या येत आहेत, टीव्हीवर सुद्धा दृष्य दिसताहेत दुकानामध्ये झुंबड उडाली आहे. लोकं रस्त्यावर आलेली आहेत. गैरसमज करुन घेऊ नका अशी विनंती आहे. कोणत्याही परिस्थितीत जीवनाश्यक वस्तू सुविधा बंद केल्या जाणार नाहीत,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं. “राज्यातील सर्व जनतेला माझं आवाहन आहे की त्यांनी आपल्या मनातील भिती दूर करावी. आपल्या मनातील भिती दूर करा असं मी तुम्हाला सांगेन”, असं मुख्यमंत्री म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी कोणकोणत्या सेवा बंद होणार नाही याची यादीच वाचून दाखवली.

आत्यावश्यक सेवा कधीच बंद होणार नाहीत, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार खालील सेवा लॉकडाउनच्या काळतही सुरु राहतील

औषधे
औषधे बनवणाऱ्या कंपन्या
फायर ब्रिगेड
महापालिका
पोलीस
भाजीपाला
दूधाच्या गाड्या
धान्याच्या गाड्या

ट्विटही केलं…

“माझे पंतप्रधान नरेंद्र मोदींजी यांच्याशी बोलणे झाले. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले जे नियम आहेत ते तसेच राहतील. जीवनावश्यक सोयी व सुविधा सुरूच राहतील. कोणीही गोंधळू नये, घाबरु नये आणि रस्त्यावर, दुकानात बाजारपेठेत गर्दी करू नये,” असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी ट्विटवरुनही केलं आहे.

संकट अतिशय गंभीर आहे. हे लक्षात घ्या. संकटाची भिती नको पण गंभीर्य ठेवा, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus these essential services will be functional in lockdown says cm uddhav thackeray scsg
First published on: 24-03-2020 at 23:28 IST