रायगडच्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय साहाय्यक विनोद लचके याला सव्वा लाख रुपयांची लाच घेताना मंगळवारी लाचलुचपत विभागाने अटक केली. अटकेनंतर केलेल्या तपासात त्याच्याकडे तब्बल ६० लाख ६० हजार रुपयांची रोकड आढळून आली आहे. लचके यांना अलिबागच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, लाचलुचपत विभागाने निवासी जिल्हाधिकारी डॉ. जगन्नाथ वीरकर यांची चौकशी सुरू केली आहे. लचके याच्या अटकेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आला आहे.
या प्रकरणी निवासी जिल्हाधिकारी वीरकर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय साहाय्यक केदार शिंदे आणि खुद्द जिल्हाधिकारी एच. के. जावळे यांचे नावही समोर येऊ लागले आहे. कारण तक्रारदार कृष्णा आंबवणे यांनी दिलेल्या तक्रारीत लचके यांनी या चौघांसाठी लाच घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे.
कर्जत येथील वेणगाव येथील सव्‍‌र्हे नंबर ५६-१ या ४५ गुंठे ही जागा बिनशेती करण्यासाठी कृष्णा आंबवणे यांनी मे २०१३ला अर्ज केला होता. सदर प्रकरणात वीरकर लचके यांनी १ लाख ९० हजार रुपयांची लाच मागितली होती. ही रक्कम जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय साहाय्यक आणि स्वत अशी चौघांमधे वाटली जाणार असल्याचे सांगितले होते. यातील ४० हजारांची रक्कम लचके यांनी या महिन्याच्या ११ तारखेला घेतली होती. तर उर्वरित दीड लाखाची रक्कम २३ जुलैला मागितली होती. मात्र आंबवणे यांनी यात तडजोड करुन १ लाख २५ हजार देण्याचे मान्य केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील मंदिरात ही रक्कम देण्याचे ठरवण्यात आले होते. आंबवणे यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली होती. अखेर मंगळवारी रात्री सापळा रचून लचके यांना लाचेच्या रकमेसह अटक करण्यात आली.
लचके यांना पकडल्यांनतर या रकमेखेरीज कार्यालयात चार लाख १० हजारांची रक्कम आढळून आली; तर लचके यांच्या घरी केलेल्या झडतीत ५५ लाख २८ हजार ५०० रुपयांची रक्कम सापडली. लाचलुचपत विभागाने ही सर्व रक्कम जप्त केली. या प्रकरणी अलिबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासंबधित आणखीन कोणाच्या अशा तक्रारी असतील तर लाचलुचपत विभागाशी तात्काळ संपर्क साधण्याचे रायगड लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील कलगुटकर यांनी केले आहे. दरम्यान या प्रकरणात निवासी जिल्हाधिकारी यांचा नेमका काय संबंध आहे याचा तपास करण्यात येत आहे. वीरकर यांना बुधवारी लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्हाधिकारी आणि त्यांचे स्वीय साहाय्यक यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.