सांगली : दुचाकीला पाठीमागून आलेल्या भरधाव मोटारीने ठोकरल्याने एक वर्षाच्या मुलासह पतीपत्नी ठार झाल्याची घटना शनिवारी पहाटे रत्नागिरी-नागपूर महामार्गावर घडली. अपघातग्रस्त कुटुंब धाराशिव जिल्ह्यातीत (ता.कळंब) येथील असून ऊसतोडीचा हंगाम संपल्यानंतर दुचाकीवरुन गावी जात होते. अपघातानंतर मोटारीच्या वाहन चालकांने पोबारा केला आहे.

उसतोडीचे साखर कारखान्याचे काम संपल्यानंतर सुरेश युवराज शिंदे (वय २९), त्याची पत्नी संजना (वय २८) व मुलगा ज्ञानेश्वर (वय१) वर्षे असे तिघेजण मोटारसायकल वरून ( एमएच १२ केबी ८४५२) जात होते. आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भोसे गावच्या पुढे ५ कि. मी. अतंरावर गेले असता पाठीमागुन येणाऱ्या एका चारचाकी वाहन ( एमएच १२ यूजे ०७१५) चालकाने मोटारसायकलीस पाठीमागुन भरधाव वेगाने येवुन धडक दिली. यात मोटारसायकल वरील तिघेजण गंभीर जखमी झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गंभीर जखमी अवस्थेत तिघांना रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला असून मोटारीच्या दर्शनी भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर मोटार चालक जखमींना कोणतीही मदत न करता अपघाताची माहिती पोलीसांना न कळविता परस्पर निघुन गेला आहे.