अहिल्यानगर: बनावट अपंग प्रमाणपत्र बनवून संजय गांधी निराधार योजना व अपंगांना मिळणाऱ्या इतर योजनांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून राहुरी पोलिसांनी ताज निसार पठाण व रुबीना ताज पठाण या पती-पत्नीला अटक केली. न्यायालयाने या दोघांनाही चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात देवळाली प्रवरा येथील ग्राम महसूल अधिकारी दीपक नामदेव साळवे यांनी फिर्याद दिली आहे. अटक केलेल्या या दाम्पत्याने देवळाली प्रवरा नगरपालिकेचीही फसवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या दृष्टीने पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज पठाण व रुबीना पठाण हे दोघे पती-पत्नी दिव्यांग नसतानाही संजय गांधी निराधार योजना व इतर योजनांचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. या संदर्भात चौकशी केल्यानंतर प्रमाणपत्र बनावट असल्याचा संशय बळावला. त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी साळवे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली.

न्यायालयात सरकारतर्फे बाजू मांडताना श्री. पाटील यांनी सांगितले की, बनावट प्रमाणपत्रातील मूळ सूत्रधार शोधून व बनावट प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी जिल्हा सरकारी रुग्णालय व इतर कार्यालयातील कोण या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत का, याचा तपास करायचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी मिळावी. पुढील तपास पोलीस निरीक्षक ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू जाधव, अंमलदार गणेश लिपणे, महिला अंमलदार वृषाली कुसळकर करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नगरमध्ये यापूर्वी प्राथमिक शिक्षकांनी बदली प्रकरणात सादर केलेले दिव्यांगांचे बनावट प्रमाणपत्र प्रकरण गाजलेले आहे. यासंदर्भात गुन्हाही दाखल झाला आहे. सध्याही बदल्यांच्या प्रकरणात बनावट प्रमाणपत्राच्या संशयावरून असे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची पडताळणी जिल्हा परिषदेमार्फत सुरू आहे. वेळोवेळी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांची प्रकरणे उघडकीस येऊनही त्यास आळा बसलेला नाही. जिल्हा सरकारी रुग्णालयातून दिव्यांगांची बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याचा गुन्हा नगर शहरात दाखल आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने अंतर्गत चौकशी समिती नेमून काही कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. बनावट दिव्यांग प्रमाणपत्राची व्याप्ती मोठी असल्याने सखोल तपासाची आवश्यकता निर्माण झाली आहे. दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संघटना आणि त्यासाठी वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत.