जुळ्या मुलींच्या जन्माचं शिर्डीत अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं असून शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. जुळ्या मुली झाल्याचं कळताच कुटुंबाने संपूर्ण रुग्णालयाला विद्युत रोषणाई करत सजावट केली. बिपीन आणि निलिमा कोते यांना लग्नाच्या तब्बल १२ वर्षानंतर अपत्य झालं. त्यातही जुळ्या मुली झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आपला हा आनंद त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.
कोते दांपत्याकडून संपूर्ण रुग्णालयाला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. इतकंच नाही तर ज्या वॉर्डमध्ये मुलींना ठेवण्यात आलं होतं त्यालाही त्यांनी फुलं आणि फुग्यांनी सजवलं होतं. मुलींच्या जन्माचं इतक्या थाटात स्वागत केल्याने शहरात कोते दांपत्य चर्चेचा विषय ठरलं असून त्यांचं कौतुक केलं जात आहे. कोते कुटुंबीय हे साईबाबांचे निस्सीम भक्त असून दर गुरुवारी निघणाऱ्या साईबाबांच्या पालखीचा मान त्यांच्या कुटुंबाला आहे.