Covid 19 : राज्यात दिवसभरात ६ हजार ४७९ नवीन करोनाबाधित; १५७ रूग्णांचा मृत्यू

४ हजार ११० रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत.

Corona Maharashtra
राज्यात आज रोजी ५०,६०७ अॅक्टिव्ह केसेस आहेत.(संग्रहीत)

राज्यातील करोना संसर्गाची दुसरी अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. आजही राज्यात मोठ्यासंख्येने दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही दररोज भर पडतच आहे. तर, दुसरीकडे करोनातून रूग्ण बरे होत असले तरी देखील, दररोजची करोनामुक्त झालेल्यांची संख्या ही कधी नवीन करोनाबाधितांपेक्षा जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. त्यामुळे, राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये करोना निर्बंधं अद्यापही पूर्णपणे शिथिल करण्यात आल्याचे दिसत नाही. आज दिवसभरात राज्यात ६ हजार ४७९ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ४ हजार ११० रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, आज १५७ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६०,९४,८९६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.५९ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,१०,१९४ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३२९८ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८१,८५,३५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,१०,१९४ (१३.१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,६७,९८६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,११७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ७८,९६२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Covid 19 6 thousand 479 new corona patients increased in the state during the day 157 patients died msr