अलिबाग – येत्‍या २२ जानेवारी रोजी अयोध्‍येतील श्रीराम मंदिराचे लोकार्पण होत आहे. यामुळे श्रीराम भक्‍तांमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर रायगडच्‍या म्‍हसळा तालुक्‍यातील दुर्गम डोंगराळ भागातील जांभुळ गावात राहणाऱ्या शुभम भेकरे या तरुणाने कागदावर प्रभू श्रीरामांचे ५१२ चौरस फुटांचे चित्र रेखाटले आहे. शुभमने रेखाटलेले हे भव्‍यदिव्‍य चित्र परीसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

चारकोलचा वापर करून हे चित्र रेखाटायला त्‍याला ५०० तास इतका कालावधी लागला. त्‍यासाठी ५४० कोरे कागद वापरले. कुठलीही कौटुंबिक पार्श्‍वभूमी नसलेल्‍या अतिशय गरीब कुटुंबातील शुभमने चित्रकलेचे कुठलेही शिक्षण घेतलेले नाही. चित्रांचा अभ्‍यास करण्‍यासाठी तो केवळ सोशल साईटचा वापर करतो. असे असताना त्‍याने रेखाटलेल्‍या या चित्राचे परीसरात कौतुक होत आहे. श्रीरामाचे चारकोलच्‍या सहाय्याने एवढे मोठे चित्र आपण प्रथमच काढले असून त्‍याची रेकॉर्ड बुकमध्‍ये नोंद होईल, असा विश्‍वास शुभमने व्‍यक्‍त केला आहे.

हेही वाचा – चित्रा वाघ म्हणतात, “निवडणुकीसाठी अन्य राजकीय पक्षांना महिला उमेदवार…”

म्‍हसळा तालुक्‍याच्‍या दुर्गम भागात राहणारया १९ वर्षीय शुभमने आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण म्‍हसळा येथे पूर्ण केले. लहानपणापासूनच त्‍याला चित्रकलेची आवड. घरच्‍या हालाकीच्‍या परीस्थितीतही त्‍याने आपली कला जोपासली आहे. शुभमने कुठल्‍याही प्रकारचे चित्रकलेचे शिक्षण घेतलेले नाही. तरीही त्‍याने रेखाटलेली वेगवेगळी चित्रे चित्‍ताकर्षक आहेत. रामाचा भक्‍त असल्‍याने श्रीरामांना वंदन करण्‍यासाठी आपण हे भव्‍यदिव्‍य चित्र रेखाटल्‍याचे त्‍याने सांगितले. शुभम याने काढलेले श्रीरामाचे चित्र दिवसभर तो गावच्‍या प्राथमिक शाळेसमोरील पटांगणात ठेवतो संध्‍याकाळी पुन्‍हा घरी घेवून जातो. या चित्राची माहिती परीसरातील गावांमध्‍ये पोहोचल्‍यानंतर परीसरातील रामभक्‍त आणि कलासक्‍त मंडळी भेट देऊन शुभमचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा – “तुम्ही शब्दांचे पक्के असल्याचं छाती ठोकून महाराष्ट्राला सांगता, मग…”, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना थेट सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी श्रीरामांचा भक्‍त आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्‍येतील मंदिरात श्रीरामांची प्राणप्रतिष्‍ठा होत आहे. त्‍यांना वंदन करण्‍यासाठी मी हे चित्र रेखाटले आहे. श्रीरामांचे चारकोलमधील हे सर्वांत मोठे चित्र असून त्‍याची रेकॉर्डबुकमध्‍ये नोंद करण्याचा मानस आहे. – शुभम भेकरे