गेल्या दीड महिन्यापासून ‘टँकरवाडय़ा’ त पाण्याची भांडणेही वाढली आहेत. तीव्र पाणीटंचाई असणाऱ्या चार जिल्ह्य़ांमध्ये पोलीस ठाण्यापर्यंत भांडणे पोहोचली. एकटय़ा औरंगाबाद जिल्ह्य़ात ५० हून अधिक अदखलपात्र गुन्ह्य़ांची नोंद आहे, तर १५पेक्षा अधिक गुन्ह्य़ांमध्ये पोलिसांना तपास करावा लागणार आहे. औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद या चारही जिल्ह्य़ांत पाण्यामुळे होणाऱ्या बारीक-सारीक भांडणांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस महानिरीक्षकांनी विशेष नियोजन केले आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ात ११५, तर उस्मानाबाद जिल्ह्य़ात २९ गावांमध्ये कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकेल, असा पोलिसांचा अंदाज आहे.
दररोजच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी तीव्र पाणीटंचाई असणाऱ्या ‘अ’ वर्गातील गावांमध्ये प्रत्येकी एका हवालदाराची नेमणूक करण्यात आली आहे. काही जिल्ह्य़ांमध्ये सहायक पोलीस निरीक्षकही नेमले आहेत. दिवसेंदिवस पाण्याची स्थिती गंभीर होत आहे. पिकांचे उत्पादन घटल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या हातीही पैसे नाहीत. दरवर्षी उन्हाळ्यात चोरी, घरफोडी असे प्रकार वाढतातच. मात्र, या वर्षी त्यात वाढ तर झालीच आहे. शिवाय पाण्यासाठीची भांडणे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.
औरंगाबाद जिल्ह्य़ात अकराशेहून अधिक गावे आहेत. २१ पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सांभाळली जाते. दुष्काळाची स्थिती लक्षात घेतल्यानंतर तीव्र पाणीटंचाईची गावे कोणती, याचा शोध पोलिसांनी आपल्या पद्धतीने घेतला. औरंगाबाद जिल्ह्य़ात १५१ गावांमध्ये भांडणे होऊ शकतात. ही भांडणे कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची स्थिती निर्माण करू शकतात. ‘ब’ वर्ग श्रेणीतील ४२० गावे आहेत, तर ‘क’ वर्गश्रेणीत ४९० गावांचा समावेश आहे. पाण्याच्या भांडणाच्या तक्रारी आता पोलीस ठाण्यापर्यंत येऊ लागल्याचे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी सांगितले. उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई व दुष्काळ लक्षात घेता ‘अ’ वर्गाच्या प्रत्येक गावाची जबाबदारी पोलीस शिपायाकडे सोपविली आहे. गावातील लोकप्रतिनिधी, पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून दररोज टँकर आल्यानंतर भांडणे होतात का, हे पाहावे आणि पाण्याचे भांडण दोन समाजात तेढ निर्माण करणारे तर ठरत नाही ना, याची दक्षता घ्यावी, असे कळविण्यात आले आहे. या साठी पोलिसांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. दररोज या माहितीचा आढावा पोलीस अधीक्षक घेतात आणि त्याचा अहवाल महानिरीक्षक कार्यालयापर्यंत जातो.
उस्मानाबाद जिल्ह्य़ात पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. या जिल्ह्यात ‘अ’ श्रेणीत शहरांचाही समावेश आहे. विशेषत: उस्मानाबाद, उमरगा, तुळजापूर आणि परंडा या शहरांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. जिल्ह्य़ातल्या काही गावांमध्ये सरासरीच्या १० टक्केही पाऊस झालेला नाही. अशा गावांची पोलिसांनी वेगळी यादी केली आहे. अशा २९ गावांसाठी पोलिसांनी दत्तक योजना राबविली. दोन हेडकॉन्स्टेबल व एक सहायक पोलीस निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्य़ातील ५ तालुक्यांमध्ये ५५१ गावांवर पोलिसांची नजर आहे. विशेषत: आष्टी-पाटोद्यात पाण्याची तीव्रता अधिक आहे. ‘अ’ श्रेणीतील गावांची संख्या २३९ असून येथे किरकोळ भांडणाचे प्रकार तर वाढले आहेत. त्यातील काही तक्रारी अलीकडच्या काळात पोलीस ठाण्यापर्यंत येऊ लागल्या आहेत. काही वेळा पोलिसांना वाद घालणाऱ्या दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करावे लागत आहेत. दिवसेंदिवस पाण्यासाठीची कटकट वाढत असून जालन्यातही अशीच स्थिती आहे. ‘अ’ श्रेणीत २०० गावे असून त्यातील बहुतांश गावे अंबड, घनसावंगी व बदनापूर तालुक्यातील आहेत. ही आकडेवारी बदलू शकते. जसजशी टँकरची संख्या वाढते आहे, तसतसा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होत आहे.