पाच सदस्‍यीय चौकशी समिती गठन.

अलिबाग – रायगड जिल्‍हा परीषदेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची बाब समोर आली आहे. पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याने पगार बीले तयार करताना कर्मचाऱ्यांचे नसलेले कपात किंवा वेतन फरक दाखवून, या रकमा तो आपल्‍या खात्‍यावर वळवत असे. अन्‍य विभागात कार्यरत असताना कोरडे याने असे उपदव्‍याप केल्‍याची बाब समोर आली आहे. नाना एकनाथ कोरडे असं त्‍याचं नाव आहे. दरम्‍यान या प्रकरणाची चौकशी करण्‍यासाठी पाच सदस्‍यीय चौकशी समिती गठित करण्‍यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांनी दिली आहे.

नाना कोरडे हा  पाणी पुरवठा विभागात वरिष्‍ठ सहायक लिपीक म्‍हणून कार्यरत आहे. तो कर्मचारयांची वेतन बीले तयार करण्‍याचे काम करीत असे. ही बीले तयार करताना कर्मचारयांची मागील थकबाकी किंवा वेतन फरकाची रक्‍कम दाखवत असे. त्‍याचे धनादेश स्‍वतःच सहया करून बनवत असे व ही रक्‍कम परस्‍पर स्‍वतःच्‍या किंवा पत्‍नीच्‍या खात्‍यावर वर्ग करत असे. गेली दीड वर्षे हा प्रकार सुरू होता. सध्‍या तो पाणी पुरवठा विभागात कार्यरत असून तिथं त्‍याने १ कोटी १९ लाख रूपये अशा प्रकारे हडप केल्‍याचे प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. या प्रकरणातील ६८ लाख रूपये त्‍याने दोन धनादेशांव्‍दारे जिल्‍हा परीषदेला परत केले आहेत. नाना कोरडे हा यापूर्वी एकात्मिक बालविकास विभागात कार्यरत होता तिथंदेखील त्‍याने असे प्रकार केल्‍याची बाब समोर आली आहे. हा एकूण अपहार ४ ते ५ कोटी रूपये इतका असण्‍याची शक्‍यता आहे.

पाच सदस्‍यीय चौकशी समिती

या संपूर्ण प्रकाराच्‍या चौकशीसाठी पाच सदस्‍यीय समिती गठीत करण्‍यात आली आहे. यात उपमुख्‍य लेखाधिकारी महादेव केळे, लेखाधिकारी सचिन घोळवे, सहाय्यक लेखाधिकारी समीर अधिकारी, पराग खोत आणि नितीन खरमाटे यांचा समावेश आहे. यात सध्‍यातरी अन्‍य कर्मचारयांचा सहभाग दिसून येत नाही. मात्र त्‍याचीही कसून चौकशी केली जाणार आहे. अलिबाग येथील एकात्मिक बालविकास प्रकल्‍प कार्यालय येथेही त्‍याने पैशाचा अपहार केल्‍याचे सकृतदर्शनी समोर आले आहे. तो म्‍हसळा येथेही कार्यरत होता. तेथे त्‍याने असे प्रकार केले आहेत का याचीही चौकशी केली जाणार आहे.

भांडे कसे फुटले ?

आर्थिक वर्षातील शेवटचे तीन महिने महत्‍वाचे असतात. आयकरासंदर्भात तपासणी या काळात होत असते. ही करत असताना लेखा विभागील अधिकाऱ्यांना तपासणी करताना काहीतरी काळंबेरं असल्‍याचा संशय आला. त्‍यानी ही बाब वरिष्‍ठांच्‍या कानावर घातली. त्‍यानंतर सखोल चौकशी केली असता अपहार समोर आला.

या प्रकरणाची कसून चौकशी करण्‍यात येईल. त्‍यासाठी समितीदेखील गठित केली आहे. नाना कोरडे यापूर्वी ज्‍या ज्‍या कार्यालयात काम करीत होता तिथंही झाडाझडती होईल. यात मोठा अपहार असल्‍याचा अंदाज आहे. प्राथमिक अहवाल आल्‍यानंतर कोरडे यांच्‍यावर कारवाई केली जाईल. बँकेच्‍या कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जाणार आहे. संपूर्ण चौकशी झाल्‍यानंतर पोलीस कारवाई देखील केली जाणार आहे. – डॉ. भरत बास्‍टेवाड, मुख्‍य कार्यकारी अधिकारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रायगड जिल्‍हा परिषद या प्रकरणात अनेक लोक सामील असण्‍याची शक्‍यता आहे. अपहार करणारया कर्मचारयांना राजकीय वरदहस्‍त होता का याचीही चौकशी व्‍हायला हवी. याची माहिती मिळताच कसून चौकशी आणि कठोर कारवाईचे निर्देश जिल्‍हा परिषदेला दिले आहेत. ज्‍या बँक खात्‍यात हे व्‍यवहार झाले त्‍या बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यात मदत केलीय का हेदेखील तपासून पाहिले पाहिजे. महेंद्र दळवी, आमदार