राहाता: शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान आयोजित श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या आज, गुरुवारी मुख्य दिवशी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या लाखो भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या पालखीतील साईभक्तांच्या साईनामाच्या गजराने शिर्डी दुमदुमून गेली होती. साईबाबा संस्थान गर्दीचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरल्याने साईभक्तांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
आज उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. मिरवणुकीत संस्थानचे तदर्थ समितीचे पदाधिकारी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त उपस्थित होते. सायंकाळी ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा साईसंध्या कार्यक्रम झाला. रात्री श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने साईभक्त, ग्रामस्थ सहभागी झाले होते. आज समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे ठेवण्यात आले होते.
अमेरिकेतील दानशूर साईभक्त श्रीमती सुभा पै यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. चेन्नई येथील श्रीमती ललिता मुरलीधरन व मुरलीधरन या साईभक्ताने साईचरणी ३ लाख ५ हजार रुपये किमतीचा ५४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण-हिरेजडित ‘ब्रोच’ साईचरणी अर्पण केला, तर एका साईभक्ताने सुमारे दोन किलो वजनाचा चांदीचा आकर्षक हार आणि सुमारे ५९ लाख रुपये किमतीचा ५६६ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण केला. या देणगीदार साईभक्ताच्या विनंतीनुसार त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे. उत्सवाची सांगता उद्या, शुक्रवारी काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.
नियोजनाअभावी साईभक्तांना मनस्ताप
उत्सव कालावधीत जिल्हा प्रशासन व साईबाबा संस्थान संभाव्य होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन बैठक घेते, परंतु गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशी बैठक न झाल्याने शिर्डीत आज साईभक्तांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मंदिर परिसरात ठिकठिकाणी लोखंडी अडथळे लावल्याने भक्तांची एकाच प्रवेशद्वारातून बाहेर पडण्यासाठी गर्दी झाली होती. संस्थानचे अधिकारी आपल्या दूतांकरवी त्यांचे मित्र व नातेवाईक यांना कुठल्याही अडथळ्याविना सरळ मंदिरात दर्शनासाठी पाठवित असल्याचे दृश्य समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारावर बघायला मिळाले, तर दुसऱ्या बाजूला सामान्य भक्त दर्शनासाठी रांगेत उभे राहून कासावीस झाले होते. शिर्डी शहर वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियोजन व्यवस्थितरीत्या न केल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचे बघावयास मिळाले.
वृक्षप्रसाद योजना
निसर्गसंवर्धन आणि भक्तीचा समन्वय साधत साईबाबा संस्थानची वृक्षप्रसाद योजना आज सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत इच्छुक साईभक्तांना प्रसादस्वरूप निंबवृक्षाची रोपे वितरित केली जात आहेत. सह्याद्री देवराईचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाचे स्वागत महाराष्ट्रातील विविध प्रमुख मंदिरे करत असून, श्री साईबाबा संस्थाननेही यामध्ये पुढाकार घेतला आहे. साईसच्चरित या ग्रंथात उल्लेख केल्यानुसार साईबाबांनी निंब वृक्षाला अत्यंत पवित्र स्थान मानले असून, या निंब वृक्षाखाली माझ्या गुरूंचे स्थान आहे. असे त्यांनी सांगितले होते. त्याच भक्तिपूर्ण संदर्भातून पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही योजना सुरू करण्यात आली आहे.