निसर्गाचे वरदान लाभलेलं कोकणही आता पर्यटकांच्या पसंतीस उतरलं आहे. कमीतकमी वेळात जास्तीत जास्त आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी रायगडच्या किनाऱ्यांची निवड केली आहे. मे महिन्यातील शेवटच्या शनिवार -रविवारी रायगडचे किनारे सध्या पर्यटकांनी फुलून गेले. यावेळीही पर्यटकांनी मिनीगोवा म्हणून नावरूपाला आलेल्या अलिबाग व दिवेआगरच्या किनाऱ्यांना अधिक पसंती दिली आहे .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नारळी पोफळीच्या बागा, रूपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि फेसाळणाऱ्या लाटा यामुळे रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांचे फेवरेट डेस्टीनेशन ठरलंय. दूरचा प्रवास करून गोव्याला जाण्यापेक्षा तोच किंबहुना काकणभर सरस आनंद पर्यटकांना मुंबईपासून हाकेच्या अंतरावर मिळतोय. सुटीच्या दिवसात रायगडतील या किनाऱ्यांकडे पर्यटकांची पावले आपोआप वळतात. गेल्या चार अलिबाग, काशिद, मुरूड, दिवेआगर, हरिहरेश्वरच्या किनाऱ्यांवर ५० हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे.

सध्या बच्चे कंपनीच्या शाळांना सुटी आहे. मे महिन्यातील हा शेवटचा शनिवार रविवार. उन्हामुळे मोठय़ांचाही जीव कासावीस झालाय. अशावेळी रायगडचे निसर्ग संपन्न किनारे मनाला वेगळा आनंद देवून जातात. इथल्या समुद्रात मनसोक्त डुंबण्याबरोबरच वेगवेगळ्या वॉटरस्पोर्ट्सचा आनंद पर्यटक घेत आहेत. घोडा आणि उंटांच्या सवारीमुळे बच्चे कंपनी तर पॅरासेलींग एटीव्ही राईड्स, जायंटबॉलसारख्या साहसी खेळांची रेलचेल यामुळे बडीमंडळीही खुश आहेत. इथून पाय निघत नाही. असं पर्यटक सांगतात. इथल्या ताज्या मासळीच्या आस्वादानेही पर्यटकांच्या जीभेचे चोचले पुरवले जाताहेत. आम्ही पहिल्यांदाच कोकणात सहकुटुंब आलो. इथं खूप मस्त वाटतंय किनाऱ्यांवरून फिरताना समुद्रात डुंबताना मजा आली. पापलेट सुरमईसारखे ताजे मासे खायला मिळाले. खूप आनंद मिळाल्याचे औरंगाबादहून आलेल्या संतोष मोरे यांनी सांगितले.

पर्यटकांच्या वर्दळीने किनारपट्टी गजबजली आहे. त्यामुळे चांगला रोजगार उपलब्ध झाला असून व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मिनीगोवा म्हणून नावारूपाला आलेल्या रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची ही रेलचेल मे महिन्याच्या अखेपर्यंत अशीच कायम राहणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crowded beaches vacation period
First published on: 30-05-2017 at 03:18 IST