सलग सुट्ट्यांमुळे साताऱ्यातील पर्यटनस्थळी गर्दी

दिवाळी सणानिमित्त सलग सुट्ट्याही आल्याने पर्यटक महाबळेश्वारला गर्दी करतात.

सलग सुट्ट्यांमुळे सध्या महाबळेश्वार-पाचगणी परिसरात पर्यटकांची गर्दी आहे. करोनाकाळात ठप्प झालेल्या येथील पर्यटन व्यवसायाने पुन्हा उभारी घेतली आहे.

|| विश्वास पवार

पाचगणी, महाबळेश्वारमधील बहुसंख्य हॉटेल्स आरक्षित

वाई : सलग आलेल्या दिवाळी सुट्ट्यांमुळे साताऱ्यातील महाबळेश्वार पाचगणी कास पठार, ठोसेघर, वासोटा ट्रेक, धोम धरण, कोयनानगर आदी पर्यटनस्थळी मोठी गर्दी केली आहे. या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेचं नियोजन करण्यात आले आहे. महाबळेश्वारचा दिवाळी पर्यटक हंगाम सुरू झाला आहे. यंदा ऑनलाइन बुकिंगला अधिक पसंती आहे.

दिवाळी सणानिमित्त सलग सुट्ट्याही आल्याने पर्यटक महाबळेश्वारला गर्दी करतात. यंदाही महाराष्ट्रासह गुजरातमधून पर्यटक गटागटाने येत असून हॉटेल रेस्टॉरंट अगोदरच आरक्षित झाली आहेत. बंगले, रेस्टॉरंट हॉटेल, फार्महाऊसचे दर या वेळी आटोक्यात आहेत. अचानक वाढलेल्या गर्दीने व पूर्व आरक्षणाने महाबळेश्वार पाचगणीतील लॉजेस चढ्या दरानेही बुक झाल्याने पर्यटकांना निवाऱ्यासाठी वणवण करावी लागत आहे. करोना संसर्गानंतर मागील सात ते आठ महिन्यांपासून बंद असलेलं पर्यटन स्थळ सुरू झाल्याने दिवाळीच्या निमित्ताने पर्यटकांनी पुन्हा एकदा पर्यटनस्थळांच्या सहलीला सुरुवात केली आहे.

अतिवृष्टीने रस्त्यांचे नुकसान

दोन्ही शहरांतील हॉटेल व्यवसाय तेजीत आहे. नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेला वेण्णा तलाव असो की, येथील विविध पॉइंट सर्वत्रच या गर्दीने हे नंदनवन फुलून गेले आहे. या वर्षीच्या अतिवृष्टीने महाबळेश्वार तालुक्यातील रस्त्यांचे खूप मोठे नुकसान झाले होते. अनेक रस्ते वाहून गेले होते. दरडी कोसळल्याने व भूस्खलन झाल्याने अनेक गावे कित्येक दिवस संपर्कहीन झाली होती. मात्र या परिसराचे आमदार मकरंद पाटील यांनी प्रशासनाला बरोबर घेऊन महाबळेश्वार तालुक्यातील पर्यटन पूर्वपदावर आणण्यासाठी मोठी शिकस्त केली.

   पोलीस निरीक्षक संदीप भागवत व पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी सर्व रस्त्याची पाहणी केली. अडथळे दूर केले आहेत. पाचगणी येथील बाजारपेठेतून महाबळेश्वारकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. टेबल लॅण्ड, सिडनी पॉइंट, पारशी पॉइंट, हरिसन फॉली येथेही चोख बंदोबस्त आहे. येथेही पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी वाहतूक ठप्प होणार नाही यासाठी नियोजन केले आहे.

कृषी विभागाकडून प्रयत्न

या वेळी कृषी विभागाने महाबळेश्वार तालुक्यातील लिंगमळा, क्षेत्र महाबळेश्वार, मेटगृताड आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतात काळा गहू, काळा भात, लाल भात व हिरवा भाताचे उत्पादन घेतले असून याच्या विक्रीची दुकाने रस्त्याकडेला विक्रीसाठी स्टॉल लावले आहेत. शेतकरी बांधवांना बियाणे दिले, परंतु त्याच्या विक्रीची माहिती होण्यासाठी स्टॉल लावला आहे. विक्रीचा अनुभव चांगला आहे. काळा भात, लाल भात, हिरवा भात प्रथमच अनेक पर्यटक पाहत असल्याचे सांगितले. या वर्षी लाल चुटूक स्ट्रॉबेरीसाठी मात्र अगदी काही दिवस थांबावे लागेल असे दिसत आहे.

महाबळेश्वार पाचगणी येथे वाहनतळासाठी जागा उपलब्ध नाही. पोलीस ग्राउंडसह जिथे जिथे शक्य आहे त्या जागी पर्यटकांची वाहने थांबतील असे नियोजन करण्यात आले आहे. दिवाळी सुट्टीत महाबळेश्वार पाचगणी येथे पर्यटकांची मोठी गर्दी होईल असे गृहीत धरून वाहतूक नियोजन केले आहे. पुणे बंगळूरु महामार्गावरून सुरुर वाईमार्गे पाचगणी महाबळेश्वारकडे जा-ये करण्याच्या रस्त्यावर व पर्यटनस्थळावर वाहतूक कोंडी होणार नाही असे नियोजन आहे. पर्यटकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे. – डॉ. शीतल जानवे खराडे, पोलीस उपअधीक्षक, वाई उपविभाग

करोनाचे नियम पाळून पर्यटनस्थळे उघडण्यास शासनाने परवानगी दिली आहे. गर्दी होणाऱ्या पॉइंटवर पालिकेची गर्दी नियंत्रण पथके गर्दी टाळण्याचा प्रयत्न करतील. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या महाबळेश्वारची सहल आनंदमय होण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न राहील. – पल्लवी भोरे-पाटील, मुख्याधिकारी, महाबळेश्वार गिरीस्थान पालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Crowds at tourist spots in satya due to consecutive holidays most of the hotels in mahabaleshwar are reserved akp

ताज्या बातम्या