गावकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतरही लॉयड मेटल्स कंपनीचे सूरजागड येथून लोहखनिजांचे उत्खनन सुरूच असून, लॉयड मेटल्सने जंगलातील मौल्यवान सागवान झाडांची कत्तल करून रस्त्याचे काम केल्यानंतरही वनाधिकारी मुग गिळून बसले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एटापल्ली तालुक्यातील सूरजागड डोंगरावर गेल्या तीन महिन्यांपासून लॉयड मेटल्स कंपनीने प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. कंपनीने रस्ता निर्माण कार्य, लोहयुक्त दगड उत्खनन व जिल्ह्य़ाबाहेरील उद्योगांना खनिज पुरवठा सुरू केला आहे. प्रत्यक्षातएटापल्ली तालुक्यातील सूरजागड डोंगरावर गेल्या तीन महिन्यांपासून लॉयड मेटल्स कंपनीने प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. सूरजागड येथील लोहखनिजाच्या उत्खननाला परिसरातील १२ ते १५ गावांतील गावकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. गेल्या रविवारी शेकडो गावकऱ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेत लॉयड मेटल्स कंपनीचे ट्रक रोखल्यानंतर सोमवारी परिसरातील १२ गावांतील ५०० वर आदिवासींनी सूरजागड पहाडीवर ठिय्या आंदोलन केले. या वेळी ४०० आदिवासी गावकऱ्यांनी स्वत:ला अटक सुध्दा करवून घेतली. मात्र, त्यानंतरही पोलिस संरक्षणात सूरजागड येथून लोहखनिज घेऊन ट्रक घुग्घुसच्या दिशेने निघाले. यामुळे स्थानिक आदिवासी संतापले आहेत. लॉयड मेटल्स कंपनीने शेकडो मौल्यवान सागवान झाडांची कत्तल करून रस्ता बांधून कंपनीने लोहखनिजांची वाहतूक सुरू केली आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळेच स्थानिक आदिवासींनी आता कंपनीविरोधातच थेट लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.  यासाठी जनहितवादी संघटनेने स्थानिकांमध्ये जागृती निर्माण करणे सुरू केले आहे. या परिसरातील १२ गावातील आदिवासींनी या उत्खननाला मंगळवारी विरोध केला. जनहितवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन हा प्रकल्प आदिवासींच्या मुळावर उठणारा असल्याचे सांगणे सुरू केले आहे. या प्रकल्पाविरोधात ही संघटना जनमत तयार करत आहे.  परिसरातील गावकऱ्यांनी लोहखनिज नेणारे ट्रक अडवून धरले. संबंधित कंपनीने सागवान वृक्षांची तोड केल्याप्रकरणी वन विभागात तक्रार करण्यात आलेली असताना त्याची साधी दखलही वनाधिकाऱ्यांनीे घेतली नाही.

नक्षलवाद्यांकडून तिघांची हत्या

गट्टा दलमच्या नक्षलवाद्यांनी १३ जून २०१३  मध्ये सूरजागड प्रकरणी मध्यस्थी करायला गेलेल्या लॉयड मेटल्स कंपनीचे उपाध्यक्ष जसपालसिंह ढिल्लन यांच्यासह हेमलता मिनरल्सचे प्रमुख अनंत पद्मराव मल्लिकार्जून व सूरजागडचे पोलिस पाटील राजू सडमेक या तिघांची हत्या केली होती.  नक्षलवाद्यांनी या लोहखनिज प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. त्यातूनच हे हत्याकांड घडले होते. या संपूर्ण प्रकरणाकडे गडचिरोली जिल्हा पोलिस दलाचे बारीक लक्ष आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cutting tree for iron minerals mining in gadchiroli
First published on: 13-04-2016 at 01:00 IST