राजकारणात कोणी कोणाचे कायमचे मित्र अथवा शत्रू असत नाही, याची प्रचिती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुढे आली. जयंत पाटील यांच्या ‘जयंत नीती’ने वसंतदादा गटाचे तीन तेरा, तर कदम गटाचे अस्तित्व एकाकी शिलेदारासारखे झाले असून अपरिहार्यता म्हणून आज दादा-कदम गट एकत्र आला आहे. जयंत पाटील यांनी दादा गटाचा वजीर असणारे माजी मंत्री मदन पाटील यांना सारीपाटावर प्यादे बनविल्याने राजकीय निरीक्षकही अचंबित झाले आहेत. याचे दूरगामी परिणाम भविष्यातील सर्वच निवडणुकीत पाहण्यास मिळणार असले तरी जिल्ह्याच्या नेतृत्वाच्या स्पध्रेत पतंगराव कदम एकाकी पडले आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या सारीपाटावर जयंत नीतीने भल्या भल्या राजकीय निरीक्षकांचीही झोप उडेल अशी खेळी करीत जिल्ह्याच्या राजकारणात दूरगामी परिणाम ठरेल असे पॅनेल तयार करीत असताना भाजपा, शिवसेना यांना एका व्यासपीठावर येण्यास भाग पाडले. यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेत काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येत आणि आपआपल्या संस्थांना जास्तीत जास्त आíथक ताकद बँकेच्या माध्यमातून मिळविण्याचे प्रयत्न केले जात होते. यावेळीही जयंत पाटील यांनी पक्ष विरहित पॅनेलची भूमिका घेत काँग्रेसच्या नेत्यांना झुलवत ठेवीत आपले डाव शेवटपर्यंत विरोधकांच्या लक्षात येणार नाही याची दक्षता घेतली.
एकीकडे कदम गटाशी चर्चा करीत असतानाच काँग्रेसचा वजीरच आपल्या गटाकडे वळविण्यात जयंत नीती यशस्वी ठरली. मदन पाटील यांना पॅनेलमध्ये स्थान देत असताना माजी गृहमंत्री आर. आर. आबांचे बंधू सुरेश पाटील यांनाही सामावून घेत विरोधकांची ताकद कमी करण्यात यश मिळविले. सहकारी संस्था गटात सर्वात जास्त मतदान मिरज आणि वाळवा तालुक्यात मतदार आहेत. या मतांची बेरीज करीत असताना दादा गटात फूट पाडणे जयंत पाटील यांना आवश्यक होते. हे काम आ. विलासराव जगताप आणि खा. संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी पार पाडले.
कदम गटाची संस्थात्मक ताकद केवळ पलूस व कडेगाव तालुक्यात आहे. मात्र त्यामुळे सत्तेच्या गणितात हे दोन तालुके वगळले तरी फारसा फरक पडणार नाही हे गृहीत धरून जयंतरावनी आपली बुध्दिबळाची चाल रचली आहे. याच बरोबर सहकार मंत्री असताना बँक आणि बाजार समिती बरखास्त करण्याचा पतंगराव कदम यांचा डाव उलटविण्याचे प्रयत्न यानिमित्ताने त्यांनी केला आहे.
जिल्हा बँकेत झालेल्या १५७ कोटी आणि ४ कोटी अशा दोन गरव्यवहाराची जबाबदारी निश्चितीची प्रक्रिया सध्या एका बाजूला सुरू असताना होत असलेल्या या निवडणुकीत फारशी चर्चाही होणार नाही कारण निवडणुकीच्या मदानात असणारे सर्वच या ना त्या कारणाने या गरव्यवहारात अडकले आहेत. या कारवाईत थोडीशी सूट मिळावी यासाठी भाजपाचे नेते सोबत आहेतच. त्यामुळे गरव्यवहाराची चर्चा ही केवळ ‘कागदोपत्री खेळ आणि हाती केवळ केळ’, अशीच झाली तर नवल वाटणार नाही.
जयंत पाटील यांनी एकीकडे भाजपाची मदत घेत असताना राजकीय विरोधक भाजपाचे आ. शिवाजीराव नाईक यांना दूर ठेवण्यात यश मिळविले.  तसेच शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांना जवळ घेत असताना खा.संजयकाका पाटील यांनाही समान अंतरावर ठेवत पटावरील प्यादी योग्य ठिकाणी ठेवत आपण केवळ वजीरच नाही तर राजकीय बादशहा असल्याचे दाखविले आहे. या जयंत नीतीचे दूरगामी परिणाम तोंडावर असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतही दिसणार आहेत. बँकेची निवडणूक होताच बाजार समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत. यामुळे या वेळी नाराज असणाऱ्यांना बाजार समितीचे गाजर दाखविले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dada kadam groups together sangli jilha bank election digambar shinde sangli
First published on: 28-04-2015 at 04:00 IST