‘थोरांची ओळख’ पाठय़पुस्तकात समावेश
इयत्ता तिसऱ्या वर्गापर्यंत शिक्षण घेतलेले एचएमटी धानाचे जनक व प्रसिध्द धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांचा सहावीच्या ‘थोरांची ओळख’ या पाठय़पुस्तकात समावेश करण्यात आलेला आहे. नागभीड तालुक्यातील नांदेड येथील खोब्रागडे यांनी धानाचे बहुमोल संशोधन केले असून, त्यांच्या कार्याची दखल माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलामांपासूनोाजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी घेतलेली आहे.
अत्यंत गरीब परिस्थितीत आयुष्य जगणारे दादाजी खोब्रागडे यांच्याकडे अवघी दीड एकर शेती आहे. त्यात त्यांनी धानपिकाचे विविध यशस्वी प्रयोग केले. याच प्रयोगातून त्यांनी १९८५ ते ९० या कालावधीत एचएमटी धानाचा शोध लावला. आज एचएमटी धानाच्या जातीला इतकी प्रसिध्दी व मान्यता मिळाली की, भात मुंबई, दिल्लीपासून जगाच्या पाठीवर सर्वत्र प्रसिध्द आहे. इयत्ता तिसरीपर्यंत शिक्षण घेतलेले दादाजींचे प्रयोग कृषी विद्यापीठातील संशोधकालाही लाजविणारे आहेत. खोब्रागडे यांच्या या संशोधनाची दखल ‘फोर्ब्स’ या जागतिक नियतकालिकानेही घेतली. त्यानंतर खोब्रागडे यांना विविध मानसन्मान मिळाले. आता तर खोब्रागडे यांच्या संशोधनाची दखल घेऊन सहावीच्या ‘थोरांची ओळख’ या पाठय़पुस्तकात खोब्रागडे यांच्यावर एक धडाच समाविष्ट केलेला आहे. त्यात खोब्रागडे यांनी एचएमटी या धानाचा शोध कसा लावला, याची माहिती आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोब्रागडे यांचा त्यांच्या गावात जाऊन सत्कार केला होता, तसेच त्यांना संशोधन कार्यासाठी निधी व शेतजमीन देण्याचे जाहीर केले होते. दादाजींचा हा सर्व लेखाजोखा पाठय़पुस्तकात समाविष्ट झाल्याने सहावीच्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dadaji khobragade lesson introduce in school book
First published on: 29-04-2016 at 01:50 IST