अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका तरूणावर काळानं घाला घातला आहे. महाबळेश्वरला जाताना पोलादपूरच्या दरीत बस कोसळून झालेल्या भीषण अपघातात दापोली तालुक्यातील हर्णैचा रोशन तबीब होता. दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची आज सहल होती. ड्रायव्हरसह एकूण ३३ जण या बसमध्ये होते. नशीबानं केवळ एकजण बचावला असून बाकी सगळेजण मरण पावल्याची झाल्याची माहिती स्थानिक आमदारांनी तसेच प्रशासनानं दिली आहे.
हर्णै या दापोलीपासून अवघ्या १५ किलोमीटरवर असलेल्या बंदराच्या गावातलेही तीन जण या अपघातात सापडले. रोशन तबीब, किशोर चोगले व जयेंद्र चोगले असे हर्णैचे तीन तरूण दापोली कृषी विद्यापीठात नोकरीला होते आणि ते ही या सहलीत सहभागी झाले होते. अवघं २८ वय असलेल्या रोशनचं सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. रोशनची बहीण रेश्मा ही देखील दापोली कृषी विद्यापीठात नोकरी करत असल्याची परंतु ती या सहलीला गेली नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

किशोर चोगले यांचे वडील पी.एन. चोगले हे हर्णैमधल्या पाज फिशिंग सोसायाटीचे माजी अध्यक्ष आहेत. या भीषण अपघाताच्या बातमीनंतर हर्णै-दापोली परीसरावर शोककळा पसरली आहे. या अपघातातील एक जण प्रकाश सावंत नशीबानं बचावला असून त्याच्याचमुळे हा भीषण अपघात झाल्याची बातमी कळली. बस सुमारे ६०० फूट खोल दरीत कोसळत असताना काच फुटून बाहेर गेल्यामुळे प्रकाश बचावले. त्यांनी त्या अवस्थेत दापोलीतील ओळखीच्यांना फोन करून घटनेची माहिती दिली व हा अपघात झाल्याचे समजले.
ट्रेकर्सच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे हे काम अत्यंत जिकिरीचे असून सावधगिरीने करण्यात येत आहे. शक्य ती सगळी व्यवस्था स्थानिक प्रशासनानं केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधित यंत्रणा आपलं कार्य करत असल्याचं सांगितलं आहे.