Jyoti Waghmare : एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्यात ज्योती वाघमारे यांनी घणाघाती भाषण केलं आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो मदतीच्या किटवर होते. त्यावरुन एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने टीका केली होती. आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ज्योती वाघमारे यांनी त्यांना उत्तर दिलंं आहे. आदित्य ठाकरे यांचे फोटो मुलींना मदत म्हणून सॅनिटरी पॅड वाटले त्यावर कसे लावले? असा सवाल त्यांनी केला. आपल्या भाषणात फोटो दाखवत ज्योती वाघमारे यांनी हा आरोप केला.

वारीसारखाच शिवसैनिकांसाठी दसरा मेळावा-ज्योती वाघमारे

आज विजयादशमीचा दिवस, रावणाचा पराभव झाला तो हा दिवस. हिंदूहृदय सम्राट यांची गर्जना आणि आनंद दिघे यांचा वारसा तसंच एकनाथ शिंदेंची जिद्द हाच तो दसरा मेळावा आज आहे. एखाद्या वारकऱ्याच्या आयुष्यात जेवढं वारीचं महत्त्व असतं तेवढंच महत्त्व प्रत्येक शिवसैनिकासाठी दसरा मेळाव्याचं असतं. कारण हिंदुत्वाचं देणं आणि भगव्याचं स्वाभिमानी लेणं घेऊन एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा खरा दसरा मेळावा इथे साजरा होतो आहे असंही ज्योती वाघमारे त्यांच्या भाषणात म्हणाल्या.

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व विसरा मेळावा साजरा करावा

आज इथे जमलेले आहेत हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे मावळे आणि तिकडे जमले आहेत ते कोविड काळात मढ्यावरच्या टाळूचं लोणी खाणारे कावळे आहेत. तिकडे जमले आहेत ते सोनियांच्या पायाशी ज्यांनी खुर्चीसाठी झालेले लाचार असंही ज्योती वाघमारे म्हणाल्या. जे हिंदुत्व विसरले त्यांनी हिंदुत्व विसरा मेळावा साजरा करावा असाही टोला ज्योती वाघमारेंनी लगावला.

ज्योती म्हणजे फ्लॉवर नाही फायर है-ज्योती वाघमारे

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ग्रीन कार्पेट घालून दौरा केला होता. मी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला म्हणून मला ठाकरे गटाकडून सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात आले. पण ही ज्योती म्हणजे फ्लॉवर नाही, तर फायर है. मी कोणतेही पद नसताना कशाच्या जीवावर जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत होते, असा सवाल अनेकजण विचारतात. तर मला हा हक्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिला आहे. मी दलित बेटी आहे, या संविधानाने मला प्रश्न विचारण्याचा हक्क दिला आहे, असे ज्योती वाघमारे यांनी म्हटले.

रश्मी वहिनी तुमच्या मुलाला तुम्ही हेच संस्कार दिलेत? -ज्योती वाघमारे

अतिवृष्टीच्या काळात एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आणि पूरग्रस्तांना मदत केली तरी त्यांनी मदत साहित्यावर फोटो लावले म्हणून ठाकरे गटाने त्यांच्यावर टीका केली. अरे किती जळाल? यापूर्वी एकनाथ शिंदे तुमचे फोटो लावून मदत करत होते, तेव्हा नाही म्हणालात का, आमचे फोटो लावू नका. एवढेच नव्हे मध्यंतरी मुलींना सॅनिटरी पॅड वाटण्यात आले तेव्हा त्यावर आदित्य ठाकरे यांचे फोटो होते. आदित्य ठाकरे तुम्हाला बहीण नाही, हे माहिती आहे. पण तुमच्या आईने रश्मी वहिनी तुम्ही तुमच्या मुलाला संस्कार दिलेत का, असा सवाल शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे यांनी उपस्थित केला. तसंच त्या म्हणाल्या काही नेते असे असतात जे आपल्या कुटुंबालाच आपला पक्ष समजतात. पण एकनाथ शिंदेंसारखे नेते आपल्या पक्षाला कुटुंब समजतात. त्यामुळेच एकनाथ शिंदे सगळ्यांची काळजी घेतात असंही ज्योती वाघमारे म्हणाल्या.