Ajit Pawar meets Vaishnavi Hagawane family: वैष्णवी कस्पटे – हगवणे मृत्यू प्रकरणात आता सर्व आरोपींना गजाआड केलेले असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कस्पटे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि परिस्थिती जाणून घेतली. कस्पटे कुटुंबियांशी अर्धा तास चर्चा केल्यानंतर अजित पवारांनी बाहेर येऊन माध्यमांशीही संवाद साधला. वैष्णवीच्या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी केली जावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच कुणाचीही हयगय न करता या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी लक्ष घालणार असल्याचेही ते म्हणाले.

अजित पवार यावेळी म्हणाले, “वैष्णवीच्या मृत्यूची घटना घडल्यानंतर मी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्तांशी चर्चा करून जे घडले ते योग्य नाही, असे म्हटले होते. कुणाचीही हयगय न करता, कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आला तरी न जुमानता कारवाई करण्यास सांगितले होते. वैष्णवीला ज्यापद्धतीने छळले, त्यासंबंधित जे कुणी आरोपी असतील त्यांना पकडले गेले पाहिजे, असे निर्देश दिले होते. पोलिसांनी वैष्णवीची सासू, नणंद आणि पतीला अटक केली. तसेच सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार होते. पण त्यांनाही अटक करण्यात आली आहे.”

“मी कालच वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांच्याशी फोनवर संवाद साधला होता. मी तुमची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. तुम्ही मला मनमोकळेपणाने काहीही असेल तर सांगावे, असे त्यांना बोललो होतो. या प्रकरणात आणखी एक चव्हाण नावाची व्यक्ती पुढे आली आहे. वैष्णवीचे बाळ ज्या पद्धतीने हाताळले ते रेकॉर्डवर आलेले आहे. त्या व्यक्तीविरोधातही तक्रार दाखल झाली असून त्याचाही शोध सुरू आहे. आज जर तो सापडला नाही तर पोलीस आयुक्त पुढील कारवाई करतील”, असेही अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले की, कस्पटे कुटुंबियांना न्याय मिळायला हवा, असा आमचा प्रयत्न राहणार आहे. न्यायालयातही खटला ताकदीने चालावा यासाठी चांगला सरकारी वकील देण्याची आमची तयारी आहे. कस्पटे कुटुंबियांकडूनही काही नावे सुचविण्यास सांगितले आहे. सरकारी वकिलावर कुणाचाही दबाव येता कामा नये. याची खबरदारी घेतली जाईल.

जलदगती न्यायालयात खटला चालवू

हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सांगताना अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी उद्या दिल्लीला जाणार आहोत. त्यावेळी दोन तास आम्ही विमानात एकत्र असू. सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जावे, अशी मागणी त्यांच्याकडे करणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदर प्रकरण अतिशय नाजूक असून त्यातील तपशील मनाला वेदना देणारा आहे. सर्व काही सार्वजनिकरित्या बोलणे शक्य नाही, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.