सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा पक्ष असून यामुळे सर्व धर्मातील लोकांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मिरजेतील संजय भोकरे इन्स्टिट्यूटच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा शनिवारी सायंकाळी झाला. या मेळाव्यास जिल्ह्याच्या विविध भागांतून पक्ष कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. यावेळी आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.पद्माकर जगदाळे, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमणगोंडा रवि पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आम्ही सुसंस्कृत राजकारण्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहोत. जातीय सलोखा राहिला पाहिजे यासाठी सर्व धर्मातील नेत्यांना मंत्री पद देण्यात आले. तसेच जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजालाही आपल्या पक्षाबद्दल आस्था आहे. त्यांचेही प्रश्न विधिमंडळात मांडण्याची संधी मिळावी यासाठीच इद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेत काम करण्याची संधी दिली आहे.

तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. मात्र, तरुणांना आता केवळ कला अथवा वाणिज्य अभ्यासक्रम घेऊन काम मिळेलच अशी स्थिती राहिली नाही. नव्या पध्दतीचे शिक्षण तरुणांनी घ्यायला हवे. शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात ५०० कोटींची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला चांगले मोल मिळायला हवे अशी आमच्या सरकारची भूमिका आहे. जतमध्ये अद्ययावत असं वसतिगृह बांधायचं आहे त्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी देखील देण्यात येईल.

आपण कामाची माणसं आहोत, आपण दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत, लोकांचं हित पाहणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. यापुढे मी मुंबईत आठवड्यातील केवळ तीन दिवस थांबणार असून उर्वरित चार दिवस राज्याच्या विविध भागांत फिरून सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

काम करत असताना जातीयवाद कधी होऊ नये, अशी शिकवण छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला दिली आहे आणि ती शिकवण घेऊन आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता कोठे कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी. जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी महायुती आणि त्यातील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे असेही पवार यावेळी बोलताना म्हणाले.