राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांना वाय प्लस सुरक्षा व्यवस्था दिल्याचा विषय विरोधकांकडून काढण्यात आला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यानंतर विधानपरिषदेतही अनेक आमदारांनी या विषयावरुन सरकारवर टीका केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत असताना आमदारांच्या सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण विधान केले.

विरोधकांची सुरक्षा व्यवस्था काढून सरकारमधील लोकांना सुरक्षा दिल्याच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, “आमचे मित्र जितेंद्र आव्हाड हे मुख्यंमत्र्यांच्या विरोधात रोज बोलतात. वाटेल ते बोलतात. तरिही त्यांची सुरक्षा आम्ही कमी केली नाही. त्यांची वाय प्लस सुरक्षा ही वाय प्लसच ठेवली. कारण या संदर्भात आम्हाला अधिकारच नाहीत. सुरक्षेच्या बाबतीत कमिशनर इंटिलिजन्स शिफारस करत असते. त्यानुसार मुख्य सचिवांची समिती याबाबत विचार करुन सुरक्षा देत असते.”

हे ही वाचा >> “कसंही करुन फडणवीसला फसवा, आत टाका…” षडयंत्राची माहिती देताना फडणवीस म्हणाले, “मुख्यमंत्री शिंदेंनाही…”

“मी मुख्यमंत्री पदावर असताना मला झेड प्लस सुरक्षा होती. मुख्यमंत्री पद गेल्यानंतर माझी वाय प्लस सुरक्षा झाली. माझ्या पत्नीची सुरक्षा देखील कमी करुन एका पीएसओची झाली. मुलीचीही सुरक्षा काढून घेण्यात आली. शेवटी काय परसेप्शनच्या आधारावर हे निर्णय घेतले जातात.”, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. सुरक्षेव्यवस्थेबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, “सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहीजे की, सुरक्षा व्यवस्था हा स्टेटस सिम्बल नाही. अनेकांना वाटतं की, दोन चार गार्ड आजूबाजूला असले तर स्टेटस सिम्बॉल आहे. पण मला वाटतं सुरक्षा जेवढी कमी असेल तेवढं बरं. कारण लोकांचा संपर्क चांगला होतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री साध्या गाडीत फिरतात

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही मुख्यमंत्र्यांना सुरक्षेबाबत अनेकदा काळजी घेण्यास सांगतो. मुख्यमंत्री शिंदे आता बुलेटप्रूफ गाडी सोडून साध्या गाडीत फिरतात. शेवटी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता किंवा आमदार हा फक्त व्यक्ती नसून एक संस्था आहे. ज्यावेळी राज्याच्या प्रमुखावर हल्ला होतो, तेव्हा त्या व्यक्तीवर हल्ला नसून तो राज्यावर हल्ला असल्याचं समजलं जातं. त्यावरुन एखादं राज्य कमजोर असल्याचा निष्कर्ष निघतो.” यापुढे विरोधक किंवा सत्ताधारी यांच्यापैकी आवश्यक नसेल त्यांची सुरक्षा काढली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.