scorecardresearch

“कसंही करुन फडणवीसला फसवा, आत टाका…” षडयंत्राची माहिती देताना फडणवीस म्हणाले, “मुख्यमंत्री शिंदेंनाही…”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत मविआ सरकारच्या सुडाच्या राजकारणाचा पाढा वाचला.

“कसंही करुन फडणवीसला फसवा, आत टाका…” षडयंत्राची माहिती देताना फडणवीस म्हणाले, “मुख्यमंत्री शिंदेंनाही…”
उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस संग्रहित छायाचित्र

हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपाचे बार सोडत आहेत. विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विरोधकांना कोडींत पकडण्याचा प्रयत्न केला. अनेक सदस्यांनी गृहखात्यावर आरोप करत असताना पोलिस प्रशासन सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप केला होता, या आरोपांवर उत्तर देत असताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सूडबुद्धीने झालेल्या कारवाईंचा पाढाच वाचला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राजकीय कुरघोडीतून दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत अनेकांनी मत व्यक्त केलं. मागच्या काळात ज्यापद्धतीने सरकार सूडबुद्धीने वागत होते, हे सर्वांनीच पाहिले. मी स्वतः एक पेनड्राईव्ह विधानसभेत दिला. सरकारचे वकील, पोलीस अधिकारी, काही ज्येष्ठ नेते मिळून कसं एकेकाला तुरुंगात टाकायचं याचं षडयंत्र रचत होते. खोटे पुरावे तयार करत असल्याचे षडयंत्र त्या पेन ड्राईव्हमध्ये पुराव्यासह होते. जर उच्च न्यायालय नसतं तर आमचे गिरीश महाजन मोक्कामध्ये तुरुंगात गेलेले दिसले असते. प्रवीण दरेकर यांची सी समरी काढून त्यांच्याबाबतही गुन्हे दाखल करण्याचे काम झाले. मजूर कॅटेगरीतून निवडून आलेले किमान २५ आमदार आहेत. तरिही दरेकर, प्रसाद लाड यांना टार्गेट केले गेले.”

हे ही वाचा >> सुरक्षा व्यवस्थेबाबत अमृता फडणवीस यांचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री म्हणाले, “जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांना वाटेल ते बोलतात, तरिही…”

देवेंद्र फडणवीसला कसंही आत टाका

यावेळी एक गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते म्हणाले, “मलाही कशापद्धतीने तुरुंगात टाकता येईल याचे षडयंत्र रचले गेले. आताचे मुख्यमंत्री तेव्हा तिकडे सरकारमध्ये होते, त्यांना सर्व माहीत आहे. तेव्हाचे पोलिस महासंचालक आणि मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांना जबाबदारी दिली होती, कसंही करुन देवेंद्र फडणवीसला फसवा, आत टाका. पण ठिक आहे, आमचे सरकार असे वागणार नाही.”

तुम्ही हवेत बार उडवता, तोडांवर पडलात ना

“कंगणा रानावत तुमच्याविरोधात बोलली म्हणून तुम्ही तिचे घर तोडले. त्यासाठी वकीलाला ८० लाख फी दिली. कुणाचे पैसे होते ते? रवि राणा यांनी हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा मागे घेतल्यानंतरही त्यांना १३ दिवस तुरुंगात टाकले. खरंतर आमच्या मंत्र्यांवर आपण आरोप लावता आणि राजीनामा मागता. पण आपल्या काळात मंत्री तुरुंगात गेल्यानंतरही राजीनामा घेतला नाही. दुसरे मंत्री दाऊदशी संबंधीत असल्यामुळे तुरुंगात गेले, तरिही तुम्ही राजीनामा घेतला नाही. मग कुठल्या तोंडाने तुम्ही आम्हाला राजीनामा मागत आहात. आम्ही सांगतो, चूक निघाली तर राजीनामा घेऊच. पण हवेत बार उडवायचे… मुख्यमंत्र्यांच्या आरोपाबाबत तुम्ही तोंडावर पडलात ना. उच्च न्यायालयाने ही केस बंद केली.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 19:00 IST

संबंधित बातम्या