Eknath Shinde On Uddhav Thackeray : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांना ७ ऑगस्ट रोजी रात्री जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. यावेळी देशातील विविध विषयांसंदर्भात इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, या बैठकीवेळी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे शेवटच्या रांगेत बसल्याचा दावा करत शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आता यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. ‘काँग्रेसने त्यांना (उद्धव ठाकरे) त्यांची जागा दाखवली’, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (८ ऑगस्ट) माध्यमांशी संवाद साधताना लगावला आहे. तसेच काँग्रेस त्यांचा अपमान करत असेल आणि त्याचं जर उद्धव ठाकरे यांना काहीच वाटत नसेल तर आपण त्यावर काय बोलणार? असंही शिंदेंनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“जर त्यांना (उद्धव ठाकरे) त्याचं काही वाटत नसेल तर मी त्याबाबत काय प्रतिक्रिया देणार? खरं म्हणजे ज्यांचा अवमान आणि अपमान झाला, त्यांना त्याचं काही वाटत नसेल तर मला त्यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. ते स्वाभिमान जेव्हा घाण टाकतात, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जे सोडतात, विकतात, त्यांना त्याचं काहीही वाटणार नाही. त्यामुळे त्यांना त्यांची जागा काँग्रेसने दाखवली असेल”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

” खरं म्हणजे त्यांना (उद्धव ठाकरे यांना) एवढ्या पाठिमागे का बसवलं? हा प्रश्न उद्धव ठाकरे यांनाच तुम्ही विचारला पाहिजे. लोक नेहमी सांगतात की विचार पुढे असतात आणि लाचार नेहमी मागे असतात”, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

खासदार नरेश म्हस्के काय म्हणाले?

शिवसेनेचे (शिंदे) खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. म्हस्के यांनी एक्सवर सदर फोटो शेअर करत म्हटलं आहे की “काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे… शिवरायांचा वारसा सांगता ना रे… काँग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात? बाळासाहेबांनी (शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे) आम्हाला आत्मसन्मान, स्वाभिमान शिकवला. अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला, तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का? काँग्रेसने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे आदित्य ठाकरे? तुमच्यापेक्षा एकेक खासदारवाले पक्ष बरे. त्यांनासुद्धा पुढच्या रांगेत बसवलं होतं. महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत. थोडा जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उठा.”