||संतोष सावंत

पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार; मृताच्या नातेवाईकांच्या नशिबी यातना :- पनवेल उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह ठेवण्यासाठी शवागारच नसल्याने मृताच्या नातेवाईकांना अनंत यातनांना सामोरे जावे लागत आहे. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एका व्यक्तीचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईक येईपर्यंत वातानुकूलित रुग्णवाहिकेत ठेवण्याची वेळ कुटुंबीयांवर आली.

सुधाकर वेर्णेकर हे २७ ऑक्टोबर रोजी रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले. दुचाकीसमोर भटका श्वान आल्याने दुचाकी घसरून अपघात झाला. वेर्णेकर यांना पनवेलमधील सहस्रबुद्धे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी नवी मुंबईतील सानपाडा येथील सूरज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र ते बेशुद्धावस्थेतच होते. ८ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे नसल्याने कुटुंबीयांनी वेर्णेकर यांचे पार्थिव प्रथम नवी मुंबई महापालिका रुग्णालयातील शवागारात काही तासांसाठी ठेवण्याची विनंती केली, मात्र तेथील डॉक्टरांनी पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह ठेवण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात संपर्क साधण्यात आला. मात्र एमजीएममधील अधिकाऱ्यांनी शवागारात पेटी शिल्लक नसल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे वेर्णेकर यांच्या कुटुंबीयांवर वेर्णेकर यांचा मृतदेह वातानुकूलित यंत्रणा असलेल्या रुग्णवाहिकेत ठेवण्याचा निर्णय घेतला.

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात शवागार नसल्याने वेर्णेकर कुटुंबीयांच्या नशिबी अवहेलना आली.  शंभर खाटांच्या रुग्णालयात एकही शवपेटी शिल्लक नाही. तीन वर्षांपूर्वी शवपेटय़ा आल्या त्याही वेळीच कार्यान्वित न केल्याने सध्या त्या भंगारात पडून आहेत. पनवेलमध्ये महिन्याला सुमारे ९० मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येते. मात्र गरज भासल्यास हे मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णालयात शवपेटय़ा नाहीत. महिन्याला दहा मृतदेह बेवारस सापडतात. त्यांची स्थिती तर अत्यंत वाईट असते. बेवारसांची ओळख पटेपर्यंत एक महिना मृतदेह जपून ठेवण्याचा नियम आहे. परंतु पनवेलमध्ये सध्यातरी तशी सोय नाही.

आरोग्य विभागाच्या संचालिका गौरी राठोड यांनी शंभर खाटांचे रुग्णालयाच्या शुभारंभावेळी अत्याधुनिक रुग्णालय शंभर ऐवजी २०० खाटांचे असेल, असे म्हटले होते. ही सोय अस्तित्वात नाही. सध्या लोकवर्गणीतून हे काम मार्गी लावण्याचे काम शिवसेनेचे पनवेलचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण आणि त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत.