अकोल्यात मृत्यू व रुग्णवाढीचे सत्र सुरूच

आतापर्यंत ६६ जणांचा बळी; जिल्हय़ातील एकूण रुग्ण संख्या ११९२

प्रतिकात्मक छायाचित्र

दोन मृत्यू, तर २९ नवे रुग्ण आढळले; आतापर्यंत ६६ जणांचा बळी; जिल्हय़ातील एकूण रुग्ण संख्या ११९२

जिल्हय़ात करोनामुळे मृत्यू व रुग्णवाढीचे सत्र सुरू आहे. दोन रुग्णांचा मृत्यू, तर २९ नवे रुग्ण रविवारी आढळून आले. आतापर्यंत जिल्हय़ात ६६ जणांचा मृत्यू झाला असून, जिल्हय़ातील एकूण रुग्णसंख्या ११९२ झाली. अकोला जिल्हय़ात गेल्या १६ दिवसांत ३२ करोनाबाधितांचे प्राण गेले आहेत. ३६४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

जिल्हय़ात करोनाचा उद्रेक सुरूच आहे. गेल्या १६ दिवसांत रुग्णवाढीसोबतच मृत्यूचे प्रमाणही कमालीचे वाढले. ६ ते २१ जूनपर्यंत १६ दिवसात ३२ करोनाबाधित रुग्ण दगावले आहेत. दररोज सरासरी दोन रुग्णांचा मृत्यू होत आहे. मृत्यूदर झपाटय़ाने वाढत असल्याने जिल्हा हादरला आहे. शनिवारी एकाच दिवशी पाच रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी आणखी दोन रुग्णांचा बळी गेला. जिल्हय़ातील एकूण २२७ तपासणी अहवाल रविवारी प्राप्त झाले. त्यापैकी १९८ अहवाल नकारात्मक, तर २९ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ११९२ वर पोहचली. दरम्यान, नायगाव येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्णांचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना ८ जूनला दाखल करण्यात आले होते. तसेच बुलढाणा जिल्हय़ातील शेगाव येथील ५० वर्षीय महिला रुग्णाचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना १९ जूनला दाखल करण्यात आले होते.

रविवारी दिवसभरात २९ जणांचे अहवाल सकारात्मक आले. सकाळी प्राप्त अहवालात १५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात पाच महिला व दहा पुरुष आहे. त्यामध्ये शंकर नगर, गुलजारपुरा येथील प्रत्येकी तीन, अकोट फैल येथील दोन, तर गीता नगर, सिंधी कॅम्प अकोट, साबरीपुरा इंदिरानगर, वाशीम बायपास, वृंदावननगर, रामदासपेठ, लाडीज फैल येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. यातील तेरा अहवाल अकोट फैल येथील मनपा नमुने संकलन केंद्रातील आहेत. रविवारी सायंकाळी आणखी १४ रुग्णांची भर पडली. त्यात सात महिला व सात पुरुष आहे. त्यातील अकोट, शंकरनगर व लाडीज फैल येथील प्रत्येकी दोन तसेच बुलढाणा जिल्हय़ातील शेगाव, वाडेगाव, हरिहरपेठ, जुने शहर, कोळंबी महागाव, अशोकनगर, मोचीपुरा आणि लक्ष्मीनगर येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सात अहवाल अकोट फैल येथील मनपा नमुने संकलन केंद्रातील आहे.

माजी आमदाराना करोनाची बाधा

शहरातील एका डॉक्टर माजी आमदारांनाही करोनाची बाधा झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. ते जिल्हय़ातील एका आयुर्वेद महाविद्यालयाचे संस्थाचालक आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी व आता भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. करोना संकटाच्या काळात त्यांनी मास्क व आयुर्वेद काढा वाटपाचे उपक्रम राबवले. त्यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

आणखी दहा जणांची करोनावर मात

अकोला जिल्हय़ात आतापर्यंत ७६२ रुग्णांची करोनावर मात केली आहे. करोनातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यात रविवारी दुपारनंतर रुग्णालयातून सोडण्यात आलेल्या १० जणांचा समावेश आहे. त्यातील पाच जणांना घरी पाठवण्यात आले तर उर्वरित चार जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Death and morbidity sessions continue in akola abn

ताज्या बातम्या