सांंगली : ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव भुजंगराव माने (वय १००) यांचे मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने कुपवाड येथे राहत्या घरी निधन झाले. तासगाव तालुक्यातील येळावी हे त्यांचे मूळ गाव. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता. क्रांतीसिंह नाना पाटील यांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी शालेय शिक्षणाचा त्याग करीत स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली.
तरुण मुलांचे संघटन करून प्रभात फेरी काढून ब्रिटीश सरकार विरोधात जनमत तयार करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. ३ सप्टेंबर १९४२ रोजी तासगाव तहसील कचेरीवर तिरंगा फडकविण्यासाठी यशस्वी मोर्चा काढला होता. ९ सप्टेंबर १९४२ रोजी क्रांतीकारकांवर गोळीबार झाला होता. यामध्ये ९ क्रांतीकारक शहीद झाले. याला जबाबदार असलेल्या तत्कालीन फौजदाराच्या घरावर बॉम्ब हल्ला करण्यात त्यांचा सहभाग होता.
हेही वाचा – रायगडमध्ये निधीच्या विनियोगात मंत्री आदिती तटकरे पिछाडीवर
हेही वाचा – राज्यातील कुष्ठरुग्णांसाठी पोषण आहार योजना!
सातारा, विजापूर, धारवाड, नाशिक कारागृहात त्यांना ९ महिन्यांची शिक्षाही भोगावी लागली होती. भारत सरकारने त्यांना ताम्रपट देऊन सन्मानित केले होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी सहकार क्षेत्रातही काम करीत तासगावमध्ये विणकर सोसायटीची स्थापना केली होती.