scorecardresearch

लातूरमध्ये लग्नाला आलेल्या वऱ्हाडावर कोसळला दुःखाचा डोंगर, सख्ख्या भावांसह तिघांचा बुडून मृत्यू

लग्नाच्या वऱ्हाडासोबत आलेल्या दोन सख्ख्या भावांसह तीन मुलांचा अंघोळीसाठी उतरलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Swimming Drowning
प्रतिकात्मक छायाचित्र

लातूर : लग्नाच्या वऱ्हाडासोबत आलेल्या दोन सख्ख्या भावांसह तीन मुलांचा अंघोळीसाठी उतरलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (२७ मे) सकाळी जळकोट तालुक्यातील लाळी खुर्द गावात कोल्हापुरी बंधाऱ्यावर घडली. संगमेश्वर बंडू तेलंगे (वय १३), चिमा बंडू तेलंगे (वय १५) व एकनाथ हनुमंत तेलंगे (वय १५) अशी मृत मुलांची नावे आहेत.

संगमेश्वर व चिमा हे दोघे सख्खे भाऊ कर्नाटकातील कमालनगर तालुक्यातील चिमेगाव येथील, तर एकनाथ हा उदगीर तालुक्यातील निडेबन येथील रहिवासी होता. लाळी खुर्द गावातील तुळशीदास तेलंगे यांच्या मुलीचा विवाह शुक्रवारी नियोजित होता. त्यासाठी गुरुवारी रात्रीच पाहुणेमंडळी तेलंगे यांच्याकडे दाखल झाली होती.

शुक्रवारी पाहुण्यांमधील तीन मुले गावातील तिरु नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यावर अंघोळीसाठी गेले. आंघोळीसाठी उतलेल्यापैकी एकाचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी इतर दोघे जणही पाण्यात उतरले. तिघांनाही पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. अखेर तिघांचाही बुडून मृत्यू झाला.

हेही वाचा : सांगलीत पाणवठ्यात पोहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणी बुडाल्या, एकीला बचावण्यात यश, मात्र दुसरीचा दुर्दैवी मृत्यू

या घटनेचे वृत्त समजताच गावकऱ्यांनी प्रारंभी या मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाणी खोल असल्यामुळे ते प्रयत्न विफल ठरले. घटनेची माहिती तहसीलदार सुरेखा स्वामी यांना देण्यात आली. त्यांनी उदगीर येथील अग्निशामक दलाला पाचारण केले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी तीनही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेमुळे तेलंगे परिवारातील विवाहावर व लाळी खर्द गावावर शोककळा पसरली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Death of three boys while swimming in latur came for marriage pbs

ताज्या बातम्या