राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेत (एकत्रित) असताना मंत्रिपदासाठी पैसे द्यावे लागत होते. माझ्याकडे तेवढे पैसे नसल्यामुळे मला मंत्रिपद मिळाले नाही, असा गौप्यस्फोट केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना केला. उद्धव ठाकरे यांनी नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला होता. यावेळी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली होती. या टीकेनंतर व्यथित झालेल्या दीपक केसरकर यांनी एकत्रित शिवसेनेत असताना पक्षाला एक कोटींचा धनादेश दिला असल्याचे जाहीर केले. कोट्यवधीचा निधी देऊनही मंत्रिपदासाठी आवश्यक असलेला निधी देऊ शकलो नाही, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले होते.

आज मुंबईत माध्यमांशी बोलत असताना दीपक केसरकर यांनी या विषयावर अधिक भाष्य केलं. ते म्हणाले, “राजकारणात पक्ष चालविण्यासाठी पैसे लागतात. त्यासाठी देणगी द्यावी लागते. पण मंत्रिपदासाठी आम्ही पैसे कुठून देणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आम्ही आमच्या जागा विकून पक्षाला निधी देत होतो. पण मंत्रिपदासाठी मला पैसे देता आले नाहीत. त्याचे कधीही वाईट वाटले नाही.”

Maharashtra News Live : “शिवसेना सोडा, नाहीतर तुरुंगात जा”; उबाठा नेत्यांना धमकी, राऊतांचा दावा

दीपक केसरकर पुढे म्हणाले, “पैसे देऊन मंत्रिपद घेणं, हा काही उद्देश असू शकत नाही. मंत्रिपद हे सामान्यांच्या सेवेसाठी असतं. जे लोक खोके, खोके ओरडत आहेत, त्यांनी एक गोष्ट ध्यानात घ्यावी की, आमच्यापैकी कुणीही पैसे घेतले नाहीत. आम्हाला मंत्रीपद देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडून एक रुपयाही घेतला नाही. पण आमचे आधीचे नेते मंत्रिपदासाठी पैसे मागत होते, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे खोके कोण गोळा करत होतं? हे लोकांनी समजून घ्यावं”, असा खळबळजनक आरोप राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. यावेळी केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीकास्र सोडले.

“…तर भाजपा महाराष्ट्रात लोकसभेच्या १४८ जागा जिंकू शकेल”, ठाकरे गटाचा टोला; अजित पवारांचा केला उल्लेख!

“आम्ही आमची श्रीमंती सोडून राजकारणात आलो, ते गरिबांची सेवा करण्यासाठी. उद्धव ठाकरे सावंतवाडीमध्ये येऊन माझ्याबद्दल काही बोलले, ते आमच्या जनतेला पटलेलं नाही. आमचं आयुष्य इथल्या जनतेसाठी गेलं आहे. मी पूर्वीपासून याठिकाणी आमदार होतो, उद्धव ठाकरेंनी मला आमदार केलेलं नाही. उलट माझ्या लढाईमुळे शिवसेनेचा एक खासदार आणि एक आमदार निवडून आला. एकाएकी शिवसेनेची एक लाख मतं वाढली. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी शिवसेनेत आलो होतो. पण ते सोडून उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर गेले. मग तुम्ही मराठी माणसाचे हित कसे साधणार? हिंदुत्वाचा सन्मान कसा राखणार? काँग्रेसचे नेते राहुल गांधी पदोपदी स्वा. सावरकारांचा अवमान करतात. त्यांना तुम्ही मिठी मारणार असाल तर आम्हाला हे मान्य नाही. सत्तेपोटी तुम्ही तत्त्व सोडत आहात”, अशी टीका केसरकर यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर मला भाजपाकडून मोठी ऑफर होती. स्वतः पंतप्रधान मोदींनी मला भेटायला बोलवालं होतं. तिथे गेलो असतो तर निश्चितच मोठं पद मिळालं असता, असा दावाही केसरकर यांनी केला आहे. पण बाळासाहेबांच्या विचारांसाठी मी शिवसेनेत आलो. त्यामुळे पक्षात आलेल्या लोकांचा सन्मान झाला पाहीजे. त्यांना भेटी मिळाल्या पाहीजेत. कोकणची कामं झाली पाहीजेत. मतदारसंघातील कामं झाली पाहीजेत. मात्र हे केले गेले गाही”, असाही आरोप केसरकर यांनी केला.