सावंतवाडी : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी मालवण येथे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी या दुर्घटनेमधून काहीतरी चांगले घडावे आणि सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर महाराजांचा भव्य पुतळा उभारला जावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
केसरकर म्हणाले की, मनामध्ये खूप दु:ख आहे. मुंबईजवळ अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम काही तांत्रिक अडचणीमुळे थांबले आहे. तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर उभारला जावा.
हेही वाचा >>> बांधकाम विभागाच्या पत्राकडे नौदलाचे दुर्लक्ष?
पन्नास फुटांचा चबुतरा व त्यावर शंभर फूट उंच पूर्णाकृती पुतळा असावा आणि त्याच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवावे, असा सल्लाही केसरकर यांनी दिला. येेथे भव्य स्मारक उभारले गेल्यास त्याचे देशात मोठे आकर्षण असेल आणि खऱ्या अर्थाने ती शिवरायांना आदरांजली ठरेल. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. राजकोटच्या परिसरात धक्का निर्माण करून तेथून सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत जलवाहतूक सुरू करण्याचा सल्लाही केसरकर यांनी दिला.
एसआयटी चौकशीची मागणी
ही घटना महाराष्ट्राला काळिमा लावणारी आहे. पुतळ्याची जागा अपवित्र झाल्यामुळे तेथे दुधाचा अभिषेक करावा. एसआयटी नेमून याची चौकशी करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांनी केली.
निकृष्ट दर्जाचे काम व भ्रष्टाचार असल्यामुळे पुतळा कोसळला. या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करावी आणि त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा. – पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते