शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी महिलांना तिकिट वाटपात डावललं जात असल्याची खंत बोलून दाखवली आहे. आता त्यामुळे त्या नाराज आहेत का? याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र त्यांनी पुढे हेदेखील म्हटलं आहे की पक्ष देईल ती भूमिका मान्य आहे. ४०० पारचा नारा आहे, त्यामुळे काही गोष्टी पक्षाने ठरवल्या असतील तर त्या केल्या पाहिजेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेत त्यांनी निवडणुकीबाबत आपली भूमिका देखील स्पष्ट केली आहे. मी लोकसभा नाही तर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. विधानसभेसाठी माझी जोरदार तयारी सुरू आहे. लवकरच माझा मतदारसंघही जाहीर करेन, असंही दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे. हे सरकार सामान्यांचा विचार करणारं सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सामान्य माणसांचा विचार करतात. त्यामुळे ते आपल्याला न्याय देतील असंही दीपाली सय्यद म्हणाल्या आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी राजेंद्र नेरलीकर विरोधात ईडी चौकशीहीची मागणी केली आहे. राजेंद्र नेरलीकरने हजारो लोकांची फसवणूक केली आहे त्यामुळे त्याच्याविरोधात ईडी चौकशी झाली पाहिजे आणि पीडित महिला, पुरुषांना न्याय मिळाला पाहिजे असंही दीपाली सय्यद म्हणाल्या आहेत.

विधानसभा लढण्यास इच्छुक

लोकसभा निवडणूक नाही मात्र विधासनभा निवडणूक लढवण्यास मी इच्छुक आहे असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. मतदारसंघ कुठला निवडणार ते मी लवकरच तुम्हाला सांगेन असंही दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. त्यामुळे दीपाली सय्यद या आता कोणत्या मतदारसंघातून लढणार आणि त्यांना विधानसभेचं तिकिट मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजेंद्र नेरलीकरबाबत काय म्हणाल्या दीपाली सय्यद?

१९९८ पासून राजेंद्र नेरलीकरने साडेचार हजार कुटुंबाना फसवलं आहे. त्यामुळे ही कुटुंबं उद्ध्वस्त झाली. ट्रेंडिंग, गुंतवणूक या नावाखाली पैसे घेणं, त्यांच्या जमिनी विकणं, आमिष दाखवून पैसे घेणं असे सगळे प्रकार राजेंद्र नेरलीकरने केले आहेत. या लोकांपैकी अनेकजण आत्महत्या करायला निघाले होते. मात्र त्यांना आता न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी आवाज उठवते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या सगळ्यांना न्याय मिळवून देतील असं दीपाली सय्यद म्हणाल्या आहेत.