सांगली : पलुस तालुक्यातील आमणापूर येथील कृष्णाकाठावरील समर्थ अंबाजी बुवा घाटावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्त सोमवारी दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने गेला आठवडाभर गावातील सेवाभावी तरुणांकडून घाटाची स्वच्छता मोहीम सुरू आहे. सायंकाळी या घाटावर रांगोळी काढून शेकडो दिव्यांनी घाट उजळून निघाला.

या दिपोत्सव कार्यक्रमाचे हे तेवीसावे वर्ष असून गावातील तरुणाई या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती. आकर्षक रांगोळी, दिव्यांनी उजळलेला घाट यावेळच्या दिपोत्सवाचे प्रमुख आकर्षक ठरले. यानिमित्ताने कृष्णामाईची महाआरती करण्यात आली. भगवान शंकराने तिन्ही नगरे जाळून त्रिपुरासूर राक्षसाला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात.

हेही वाचा – “शरद पवार हे मार्केटमधलं एक नंबरचं नाणं म्हणूनच…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा – “कुणबी दाखले योग्य की अयोग्य ठरवण्याचा अधिकार कोणाला?”, हसन मुश्रीफांचा छगन भुजबळांना घरचा आहेर

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त त्याचबरोबर मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याच्या शहीदांना आदरांजली वाहण्याच्या निमित्ताने कृष्णा काठावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. शहीद अशोक कामटे, हेमंत करकरे, उन्निकृष्णन, तुकाराम ओंबळे आणि अन्य हुतात्म्यांना या ठिकाणी दीपोत्सव साजरा करून श्रद्धांजली वाहण्यात आली.