निश्चलनीकरणामुळे लोकांना होणारा त्रास एक महिन्यात कमी होईल, पण भविष्यात रोकडरहित व्यवहार वाढीला लागतील असे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले.
अरुंधती भट्टाचार्य या शनीभक्त आहेत. काल शनीिशगणापूर (ता. नेवासे) येथे येवून शनीदेवाचे दर्शन घेवून त्यांनी अभिषेक केला. शनैश्वर संस्थानच्या वतीने त्यांचा विश्वस्थ अनिता शेटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विश्वस्त व पोलिस पाटील सयाराम बानकर, विश्वस्थ योगेश बानकर, शिवाजी दरंदले, प्रा. गणी पटेल हे उपस्थित होते.
भट्टाचार्य म्हणाल्या, स्टेट बँकेशी संलग्न असलेल्या स्टेट बँक ऑफ बिकानेर, स्टेट बँक ऑफ जयपूर, स्टेट बॅक ऑफ त्रावणकोर, स्टेट बॅक ऑफ पतियाळा, स्टेट बॅक ऑफ म्हैसूर, स्टेट बॅक ऑफ हैदराबाद या शाखांचे विलीनीकरण मार्चपूर्वी केले जाणार होते. पण निश्चलनीकरणामुळे हे काम लांबणीवर पडले आहे. असे असले तरी निश्चितपणे विलीनीकरण केले जाईल. बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या निर्णयानंतर हा मोठा निर्णय होत आहे. त्यामुळे ग्राहकांना फायदा होईल. आता सर्व बँकांची धोरणे ही वेगवेगळी आहे. त्यात एकसूत्रता येईल. कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये कुठलाही तोटा नाही असे त्यांनी सांगितले. निश्चलनीकरणामुळे बँकांच्या ठेवी वाढतील. कौटुंबिक बचतीस चालना मिळेल. तसेच सरकारला कररुपाने जास्त पैसे मिळतील. सध्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. एक महिन्यात हा प्रश्न सुटेल. सध्या बँका, कर्मचारी यांच्यावर अधिक ताण पडला आहे. पण भविष्यात रोकडरहित व्यवहार वाढीला लागतील. पूर्वी बँकांच्या बाहेर व्यवहार मोठय़ा प्रमाणात होत असत. पैसा लोकांच्या घरात असे. आता हा पैसा बँकांमध्ये येईल. त्याचा फायदा विकास तसेच गुंतवणूक वाढीस लागण्याकरिता होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
बँकांचे कर्ज बुडण्याच्या घटना घडल्या. त्याबद्दल सरकार विशेष दक्ष आहे. स्टेट बँकेने बंद पडलेले उद्योग सुरु होवून अथवा अन्य पर्यायांचा विचार करुन त्याची वसुली व्हावी यासाठी प्रयत्न केले, या संदर्भात ‘सीडबी’बरोबर बोलणी सुरु आहे. आता कर्ज मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला आहे. पूर्वीच्या चुकांपासून धडा घेवून त्यात सुधारणा करण्याचे काम सुरु आहे. युरोपीयन संघातून ब्रिटन बाहेर पडल्यानंतर त्याचा परिणाम सुरुवातीला झाला होता. पण त्यातून बाहेर पडण्यात यश आले. स्टेट बँकेच्या ब्रिटनमध्ये शाखा आहेत. त्यांच्यावर फारसा परिणाम झालेला नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले.
कृषी वित्तपुरवठय़ात सुधारणा करण्यासाठी सरकार पावले उचलत आहेत. पण त्यासाठी पोषक असे वातावरण निर्माण झाले पाहिजे. स्टेट बँकेने याबाबत सकारात्मक भूमिका नेहमीच घेतली. आता शेतकऱ्यांना सौर उर्जेवरील वीज पंप घेण्यासाठी कर्ज देण्याची योजना सुरु करण्यात येणार आहे. एका पंपाला अडीच ते तीन लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. त्यामुळे दीर्घ मुदतीचे कर्ज देण्याची तरतूद योजनेत आहे. राज्य सरकारने जलयुक्त शवार योजनेचे काम अत्यंत चांगल्या पध्दतीने सुरु केले. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून विहिरींच्या पाण्याची आवक वाढेल. त्याकरिताच वीज पंप कर्जाची योजना हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
स्टेट बँकेने शनीिशगणापूर संस्थानला रुग्णवाहिका भेट दिली होती. त्याबद्दल संस्थानच्यावतीने भट्टाचार्य यांचे आभार मानण्यात आले. आता रुग्णालयाला व्हेंटीलेटर मशिन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच संस्थानच्या आवारात स्वाईप मशिन, एटीएम मशिन उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी मान्य केले. निश्चलनीकरणानंतर स्टेट बँकेचे एटीएम मशिन सर्वात प्रथम दुरुस्ती करुन सुरु करण्यात आले. बँकेची कामगिरी या काळात सरस ठरल्याचे भट्टाचार्य यांनी सांगितले.