शहर परिसरात डेंग्युचा प्रार्दुभाव वाढत असताना गुरुवारी या आजाराने आणखी दोन जणांचा बळी घेतला. यामुळे वर्षभरात या आजाराने बळी पडलेल्यांची संख्या २० वर गेली आहे. ठिकठिकाणी साचलेला कचरा, धूर फवारणी करण्यात अपयश यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांच्या असहाय्यतेचा फायदा घेत नफेखोरी प्रवृत्ती वाढीस लागली आहे.
जिल्ह्य़ात ऑक्टोबर महिन्यापासून डेंग्यूने डोकेवर काढण्यास सुरूवात केली. वर्षभरात डेंग्यूमुळे १८ रुग्ण दगावले असून बुधवारी रात्री चेतनानगर परिसरात राहणारे गुंतवणूक सल्लागार जितेंद्र सुरेश कुलकर्णी (४२) यांचे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पत्नीलाही डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. डेंग्यूमुळे आजारी असलेले चुंचाळे येथील सुबोधसिंग यांचाही मृत्यू झाला. एकाच दिवशी दोन रुग्णांना प्राण गमवावे लागल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने वैद्यकीय क्षेत्राकडून आर्थिक लुबाडणूक सुरू झाल्याची सर्वसामान्यांची तक्रार आहे. सध्या प्लेटलेट ६५० रुपये, लाल रक्त पेशी ११५० रुपये तर प्लाझमा ३०० रुपयाने दिल्या जात आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात दिवसाकाठी १५ ते २० रक्त पिशव्यांची मागणी होत आहे. शहर परिसरातील विविध रक्तपेढय़ांमध्ये मुबलक साठा असूनही कृत्रिम टंचाई दर्शवत जादा दराने ‘प्लेटलेट्स’ आणि रक्तपिशव्याची विक्री होत आहे. यामुळे डेंग्युचा सामना करताना रुग्ण व नातेवाईकांची आर्थिक पिळवून होत असल्याची तक्रार केली जात आहे.