महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ले रायगडच्या वैभवाचे सर्वानाच कुतूहल आहे. महाराजांच्या काळामध्ये गडावर असलेली कोटय़वधी रुपयांची संपत्ती काळाच्या ओघात गायब झाली. इतिहास संशोधकांनी शिवकालातील असंख्य महत्त्वाच्या घटना जगासमोर आणल्या, परंतु किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी परिसरांतील अवशेष पूर्ण दुर्लक्षित राहिल्यामुळे शिवकालातील अनेक घटनांचा शोध अद्याप बाकी राहिलेला आहे. या परिसरातील भग्न अवशेषांचे संशोधन करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने भारतीय पुरातत्त्व विभाग आणि शासनाकडूनही वाडी परिसरांतील ऐतिहासिक पुराव्यांकडे पुर्ण दुर्लक्ष झाल्याने शिवकालांतील सुवर्णकाळातील पाऊलखुणा आज काळाच्या पडद्याआड जाण्याच्या मार्गावर आहेत.
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट वनश्रीमध्ये रायगडवाडी गाव वसलेले आहे. महाडपासूनचे अंतर तीस किलोमीटर असल्याने पाचाड मार्गाने चित्तदरवाज्यापासून गावाकडे जाणारा पक्का रस्ता आहे. सुमारे ८०० लोकवस्ती असलेल्या गावामध्ये कोळी आवाड, हिरकणीवाडी, परडी, टकमकवाडी, नेवाळी, खडकी, शिंदेआवाड अशा सात वाडय़ा आहेत.
रायगडवाडी शिवकाळातील अत्यंत महत्त्वाचे गाव असल्यामुळे आजही गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या, वैभवाच्या जिवंत खुणा अस्तित्वात आहेत. या वाडीपासून गडाचा माथा २२५० फूट उंच असून समुद्रसपाटीपासून रायगडवाडी ६०० फूट उंचीवर आहे. त्या काळांतील व्यापारउदीम, जनजीवन, राहणीमान, सामाजिक परिस्थिती इत्यादी महत्त्वाच्या घटनांवर प्रकाशझोत टाकणारे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. शिवकाळांमध्ये किल्ले रायगडावर जाण्यासाठी या वाडीतूनच रस्ता होता. त्या काळातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असल्याने मोठी बाजारपेठदेखील होती. महाराजांचे काही प्रमुख सरदार होते, त्यांचे वास्तव्य वाडींत होते. शिवकाळानंतर गडावर अनेक स्थित्यंतरे झाली. मोगलांनी उत्तरेकडे जाताना रायगड किल्ला सिद्दीकडे दिला होता. सिद्दीचे सरदारदेखील रायगडवाडीत राहत होते. त्यांच्या वाडय़ाचे अवशेष आजही भग्नावस्थेत आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव जोडले जाई त्या गोदावरीची समाधी वाडीपासून काही अंतरावर आहे. धान्याची कोठारे, तटबंदी वाडे, तोफगोळे, भंगलेल्या तोफा यांचे असंख्य अवशेष सभोवतालच्या परिसरांमध्ये आहेत. परंतु अनेक वर्षांत अवशेषांकडे लक्ष देण्यात आलेले नाही. पुराणवस्तू विभागाकडून योग्य ती दखल घेण्यात येत नसल्याने भविष्यात हा ऐतिहासिक ठेवा काळाच्या पडद्याआड होण्याची शक्यता आहे.
 २५ एप्रिल ते ९ मे १८१८ साली इंग्रज सेनानी कर्नल प्रॉथरने गडाला वेढा घातला होता त्या वेळी गडावर अरब शिबंदीचा अधिकारी अबू होता. त्याने इंग्रजांशी तहाची बोलणी १० मे १८१८ रायगडवाडींमध्ये केली होती. महाराजांचा विश्वासू सहकारी मदरी मेहतर यांचे वंशज पाचाडमध्ये राहतात त्यांना इनाम म्हणून देण्यात आलेली जमीन या ठिकाणी आहे. सध्या हा परिसर जांभाची बाग म्हणून ओळखला जातो. त्याचे संशोधन केल्यास अनेक ऐतिहासिक पुरावे आढळून येतील असा विश्वास अनेकांना आहे. सध्या त्या ठिकाणच्या असंख्य कबरी उद्ध्वस्त झालेल्या आहेत. जुन्या तटबंदीचे अवशेष, घरांची जोती इत्यादी ऐतिहासिक खुणा असल्याने इतिहासाच्या अभ्यासकांनी या परिसराचे संशोधन केल्यास शिवकाळातील अनेक घटना प्रकाशामध्ये येतील. टाकीमखाना, टकमक टोकाच्या खालच्या ठिकाणी असलेले रायनाक स्मारक, गोदावरीची समाधी, ब्राह्मण वाडय़ाचे अवशेष, भग्न झालेले शिवमंदिर त्या ठिकाणी असलेली गणपतीच्या हनुमानाच्या मूर्ती असे एक ना अनेक पुरावे दुर्लक्षित अवस्थेमध्ये वाडीच्या परिसरांत वर्षांनुवष्रे माळरानामध्ये पडलेल्या आहेत. रायगडावर व्यापार करणारा नागराज शेट याचे निवासस्थानदेखील रायगडवाडींत आहे. नाग्याबाग म्हणून गावकरी ओळखतात. गावापासून अध्र्या किलोमीटर अंतरावर पडके जोते असून जवळच एक विहीरदेखील आहे. जोत्याचे बांधकाम शिवकालीन असून आजही काही अवशेष शिल्लक आहेत. नाग्याबागेमध्ये असलेल्या विहिरीचे पाणी ग्रामस्थ वापरीत होते. परंतु पावसाळय़ात विहिरीचा काही भाग कोसळल्यानंतर विहिरीचा वापर बंद झाल्याने दुरवस्था झाली आहे.  अत्यंत सुबक आणि चिरेबंदी दगडामध्ये बांधलेल्या विहिरीत आजही पाणी उपलब्ध असून संपूर्ण गावाला पुरून उरेल एवढा पाण्याचा साठा विहिरींत उपलब्ध असल्याची माहिती गावातील वयोवृद्ध नागरिक गणपत महादेव साटम यांनी सांगितले. या परिसरात अनेक घराण्याचा संबंध महाराजांच्या सेवेशी जोडलेला असल्याने ऐतिहासिक शस्त्रसामग्री घराघरांत असल्याने आपल्या पूर्वजांच्या आठवणी मोठय़ा अभिमानाने सांगितल्या जात असल्याचे गणपत साटम, विजय खोपकर, मारुती जाधव, बबन सावंत यांच्याकडून ऐकण्यास मिळाले.
रायगडावर जाण्यासाठी हिरकणी वाडीतून रोपवे सुविधा असल्याने पर्यटकांची चांगली सोय झाली. गावातील तरुणांचा रोजगार संपला. रोपवे नसताना तरुणांना गडावर सामान नेण्याची कामे मिळत होती, परंतु सध्या काम नसल्याने गावांतील बरेच तरुण शहरांमध्ये कामधंद्यासाठी गेले आहेत. दुसरा रोपवे रायगडवाडींतून उभारण्याची योजना राज्य शासनाची असून त्यामुळे पर्यटकांमध्ये वाढ होईल. रोजगाराची संधी मिळेल. महा दरवाजा, रायनाक समाधी, खुबलढाबुरुज अशी ऐतिहासिक ठिकाणी पाहता येतील. नवीन रोपवेसाठी जागेची उपलब्धता करून देण्यास ग्रामस्थांची तयारी असल्याचे प्रभाकर सावंत यांनी सांगितले.
किल्ले रायगड, पाचाड, हिरकणीवाडी, रायगडवाडी ही ठिकाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी निगडित असलेली स्थळे असल्याने या परिसराच्या विकासाकडे शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता असून भावी पिढीला महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाचा इतिहास जाणून घेणे शक्य होणार आहे.