“देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय लागली आहे.” असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज केला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “मी सनसनाटी निर्माण करण्यासाठी कधीही विधान करत नाही. जे विधान मी करतो त्याचे माझ्याजवळ नेहमीच पुरावे असतात, आता ती वेळ नाही योग्यवेळी सगळ्या गोष्टी सांगेन.”

याचबरोबर नामांतराबाबत बोलताना फडणवीस म्हणाले “मी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो, की महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही जो निर्णय घेतला होता की औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव कारायंच त्याला मान्यता दिली आहे. त्यानुसार काल अधिसूचना काढलेली आहे. ही अधिसूचना काढल्यानंतर आता जिल्ह्याचं नाव बदलण्याची अधिसूचना महसूल विभाग काढेल आणि महानगरपालिका व नगरपालिका नाव बदलण्याचं नोटीफिकेशन हे नगरविकास विभाग काढेल. या दोन्ही नोटीफिकेशनची तयारी झालेली आहे. सुट्टी आल्यामुळे ते कदाचित आज उद्या निघू शकणार नाहीत, ते सोमवारी निघतील. तसा आजही काढण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यामुळे यात कुठलाही गोंधळ नाही. नाव जे बदललं आहे ते शहर, तालुका, जिल्हा आणि महानगरपालिका, नगरपालिका सगळ्यांचच बदलल आहे.”

संजय राऊत नेमकं काय म्हणाले? –

भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीनंतर फोन करून मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यानंतर संजय राऊत यांनी फडणवीसांच्या या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं. “देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय लागली आहे. ते विरोधी पक्षनेते होते तेव्हाचे फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस यात खूप फरक दिसतो आहे. त्यांना स्टंट करण्याचा आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा छंद का जडला आहे मला माहिती नाही. राजकारणात आपण एकमेकांशी नेहमी बोलत असतो, चर्चा करत असतो.” असं राऊत म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy chief minister devendra fadnavis responded to sanjay raut criticism msr
First published on: 25-02-2023 at 13:26 IST